लातूरची एस.टी. सुसाट !
By Admin | Published: June 12, 2014 12:53 AM2014-06-12T00:53:44+5:302014-06-12T01:38:05+5:30
बाळासाहेब जाधव , लातूर ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या ब्रीदवाक्याने सेवा देणाऱ्या एस.टी. महामंडळाने एप्रिल-मे या दोन महिन्यांत लांब पल्ल्याच्या बसेस वाढवून ३१ कोटी १३ लाखांचे उत्पन्न मिळविले आहे.
बाळासाहेब जाधव , लातूर
‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या ब्रीदवाक्याने सेवा देणाऱ्या एस.टी. महामंडळाने एप्रिल-मे या दोन महिन्यांत लांब पल्ल्याच्या बसेस वाढवून ३१ कोटी १३ लाखांचे उत्पन्न मिळविले आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंंडळाच्या वतीने प्रत्येक आगाराला एप्रिल-मे महिन्यामध्ये उत्पन्नाचे उद्दिष्ट दिले जाते. त्या उद्दिष्टाच्या आधारे गतवर्षी लातूर विभागामार्फत येणाऱ्या लातूर आगारातून ८ कोटी ५१ लाख, उदगीर आगारातून ६ कोटी ७३ लाख, अहमदपूर आगारातून ४ कोटी ६० लाख, निलंगा आगारातून ४ कोटी ९४ लाख, औसा आगारातून ४ कोटी १० लाख असे एकूण २८ कोटी ९३ लाख रुपये उत्पन्न गतवर्षी एप्रिल-मे या दोन महिन्यांत मिळाले. तर यावर्षी लातूर विभागाअंतर्गत येणाऱ्या लातूर आगारातून ८ कोटी ९९ लाख, उदगीर ७ कोटी २४ लाख, अहमदपूर ४ कोटी ९४ लाख, निलंगा ५ कोटी ५० लाख, औसा ४ कोटी ४४ लाख असे एकूण एप्रिल-मे या दोन महिन्यांतील ३१ कोटी १३ लाख रुपये उत्पन्न मिळाले. गतवर्षीच्या प्रमाणात यावर्षी उन्हाळ्यातील प्रवासी वाहतुकीसाठी जास्तीचे कर्मचारी नेमून त्यांच्या वेळोवेळी मिटींग घेऊन, त्यांना प्रबोधन करून व लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये वाढ केल्याने लातूर विभागाचे उत्पन्न गतवर्षीच्या प्रमाणात दोन कोटीने उत्पन्न वाढल्याची माहिती विभाग नियंत्रक डी.बी. माने यांनी दिली. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून वाढलेल्या उत्पन्नामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
स्थानिक बसेसअभावी प्रवाशांची गैरसोय
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागीय कार्यालयाच्या वतीने उद्दिष्ट वाढीच्या स्पर्धेसाठी लांब पल्ल्याच्या बसेस वाढविल्या. परंतु, त्यासाठी ग्रामीण भागातील काही गाड्या बंद केल्या. परिणामी, लगीनसराईच्या कालावधीत एप्रिल-मे महिन्यामध्ये नागरिकांची गैरसोय निर्माण झाली होती. परंतु, पुढील कालावधीत प्रवाशांची अशी गैरसोय होऊ दिली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
लांब पल्ल्याच्या बसेसचा करिश्मा...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ लातूर विभागाने यंदा उत्पन्न वाढविण्यासाठी लांब पल्ल्याच्या ३२ गाड्या प्रवाशांच्या दिमतीला सोडल्या आहेत. त्यामुळे लातूर आगारासह जिल्ह्यातील सर्वच आगारांना फायदा झाला असून, महामंडळाच्या तिजोरीत २ कोटींची भर पडली आहे. एप्रिल व मे या दोन महिन्यांत लांब पल्ल्याच्या बसेसने महामंडळाला ३१ कोटी १३ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.