‘आॅनलाईन’ वितरणात लातूर तालुका अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2016 12:28 AM2016-07-22T00:28:14+5:302016-07-22T00:38:58+5:30
लातूर : आॅनलाईन प्रमाणपत्र वितरणात लातूर तहसील मराठवाड्यात प्रथम तर राज्यात चौथ्या क्रमांकावर आली आहे. वर्षभरात महा-ई सेवा केंद्राच्या माध्यमातून ७५ हजार ५०६ प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.
लातूर शहरासह तालुक्यात ४२ महा-ई सेवा केंद्र आहेत. या केंद्रांमार्फत वय, राष्ट्रीयत्व, अधिवास, रहिवासी, मिळकत आदी प्रमाणपत्रे दिली जातात. गावस्तरावर महा-ई सेवा केंद्राच्या माध्यमातून आॅनलाईन पाठविण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून तहसील कार्यालयातील संबंधित अधिकारी प्रमाणपत्रांचे वितरण करतात. तहसीलदार संजय वारकड यांच्या नियोजनामुळे वेळेत प्रमाणपत्रे दिली जात आहेत. वर्षभरात ७५ हजार ५०६ प्रमाणपत्रे वाटप झाल्याची नोंद शासन दप्तरी झाली आहे. मराठवाड्यात लातूर तहसील आॅनलाईन प्रमाणपत्र वितरणात अव्वल आली असून, राज्यात चौथ्या क्रमांकावर असल्याचे तहसीलदार वारकड यांनी सांगितले. महा-आॅनलाईन पोर्टलवरून प्रमाणपत्र वितरणाच्या सुविधा आहेत.(प्रतिनिधी)
नागरिकांची सोय व्हावी म्हणून शासनाने आॅनलाईन प्रमाणपत्र देण्याची योजना सुरू केलेली आहे. वर्षभरात जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, उपविभागीय अधिकारी प्रताप काळे यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार लातूर तहसीलचे तहसीलदार संजय वारकड, नायब तहसीलदार एस.एम. पालेवाड, नायब तहसीलदार सुरेश पाटील, आम्रे-पाटील, स्वाती गणगे, एस.टी. पेठकर, स्वाती गवळी यांनी सामुहिक प्रयत्न केल्यामुळे नागरिकांना वेळेत प्रमाणपत्रे मिळाली, हे कर्मचाऱ्यांचे सामुहिक यश असल्याचे तहसीलदार वारकड म्हणाले.