लातुरला ‘सभापती’पदाच्या घोषणेचे औचित्य
By Admin | Published: August 27, 2014 12:41 AM2014-08-27T00:41:21+5:302014-08-27T00:41:21+5:30
आशपाक पठाण , लातूर पंचायत समिती सभापती पदांचे सोमवारी आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकांना सभापतीपदाचे वेध लागले आहेत. लातूर पंचायत समितीचे सभापतीपद
आशपाक पठाण , लातूर
पंचायत समिती सभापती पदांचे सोमवारी आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकांना सभापतीपदाचे वेध लागले आहेत. लातूर पंचायत समितीचे सभापतीपद हे अनुसूचीत जातीसाठी राखीव झाले आहे. काँग्रेसचे बहुमत असलेल्या पंचायत समितीत भातांगळी गणातून निवडून आलेले रावसाहेब भालेराव हे सध्या तरी एकमेव दावेदार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी खुल्या प्रवर्गातील महिला असल्याने पुन्हा महिलेला संधी मिळण्याची शक्यता धुसरच आहे.
लातूर पंचायत समितीत १८ पैकी १६ सदस्य हे काँग्रेसचे आहेत. तर दोघे जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. अनुसूचीत जातीच्या प्रवर्गातून चार सदस्य निवडून आले आहेत. गाधवड गणातून मनीषा श्रीमंत गायकवाड, कव्हा गणातून दीपमाला नेताजी मस्के, भातांगळी गणातून रावसाहेब सुदाम भालेराव व बोरगाव गणातून राष्ट्रवादीचे अंकुश भानुदास कांबळे हे निवडून आले आहेत. काँग्रेसचे बहुमत असल्याने रावसाहेब भालेराव यांचीच सभापतीपदी वर्णी लागेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. शांत, संयमी स्वभाव असलेल्या भालेरावांना सभापतीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी महिला सभापती असल्या तरी अनुसूचीत जातीसाठी सभापतीपद राखीव झाल्याने मनीषा गायकवाड व दीपमाला मस्के यांच्यापैकी एकास संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सप्टेंबर महिन्यात सभापतींचा कार्यकाल संपणार असल्याने सभापती व उपसभापती पदांच्या निवडी सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. इच्छुकांनी सभापती व उपसभापतीपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या लातूर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदाच्या नावावर बाभळगावातूनच शिक्कामोर्तब होणार आहे़ उपसभापतीसाठी मात्र इच्छुकांमध्ये रस्सीखेच होईल़
लातूर पंचायत समितीचे सभापती व उपसभापती निवडीत दरवेळी पूर्व-पश्चिम भागाला समान संधी देण्याचा प्रयत्न राज्यमंत्री अमित देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आ़ वैजनाथ शिंदे यांनी केला आहे़ पूर्व भागातून निवडून आलेले रावसाहेब भालेराव यांची सभापतीपदी वर्णी लागल्यास उपसभापतीपद हे पश्चिम भागाला देण्यात येईल़ पश्चिम भागातून वांजरखेडा गणातून निवडून आलेले अॅड़ लक्ष्मण पाटील हे उपसभापतीपदासाठी इच्छुक आहेत़ पूर्व-पश्चिम भागाचा विचार झाल्यावर लक्ष्मण पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे़ शहरी व ग्रामीण असा निकष लावल्यावर बाभळगाव गणातील जहांगीर सय्यद यांना उपसभापतीपद दिले जाईल़ अॅड़ लक्ष्मण पाटील, जहांगीर सय्यद व बाळासाहेब कदम, व्यंकटराव पाटील यांच्यात रस्सीखेच होणार आहे़