लातूरच्या जागेसाठी अधिकाऱ्यांची फिल्डींग!
By Admin | Published: September 9, 2015 12:15 AM2015-09-09T00:15:25+5:302015-09-09T00:15:25+5:30
महेश पाळणे , लातूर शांतताप्रिय जिल्हा म्हणून लातूरची सर्वत्र ओळख आहे़ अनेक विभागातील अधिकारी लातूरसाठी प्रयत्न करीत असतात़ त्याला क्रीडा क्षेत्र तरी कसे अपवाद ठरावे़ नुकतीच
महेश पाळणे , लातूर
शांतताप्रिय जिल्हा म्हणून लातूरची सर्वत्र ओळख आहे़ अनेक विभागातील अधिकारी लातूरसाठी प्रयत्न करीत असतात़ त्याला क्रीडा क्षेत्र तरी कसे अपवाद ठरावे़ नुकतीच लातूरच्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची पदोन्नती उपसंचालक म्हणून झाली आहे़ त्यामुळे होणाऱ्या या रिक्त जागेवर अनेक क्रीडा अधिकाऱ्यांचे डोळे आहेत़ त्यातच बाहेर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनीही फिल्डींग लावल्याने या पदाची ‘हंडी’ कोण फोडणार याकडे क्रीडा क्षेत्राचे लक्ष लागले आहे़
गेल्या दोन अडीच वर्षापासून लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी पदी कार्यरत असलेले आऱडी़ माहादावाड यांची नुकतीच औरंगाबाद येथे क्रीडा उपसंचालक म्हणून पदोन्नती झाली आहे़ यासोबतच वर्धाचे जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष रेवतकर यांनाही नागपूर येथे विभागीय क्रीडा उपसंचालक म्हणून बढती देण्यात आली आहे़ औरंगाबाद येथील क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे यांचीही दोन दिवसापूर्वीच पुण्याच्या मुख्यालयी बदली झाली आहे़ या बदली, पदोन्नतीने लातूरचे जिल्हा क्रीडाधिकारी हे पद रिक्त होणार असल्याने जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरु केल्या आहेत़
कोणी सत्ताधारी आमदारांच्या शिफारस पत्राने तर कोणी राजकीय पक्षांच्या शिफारशीने तर काहींनी विविध मार्गांनी आपली फिल्डींग लावली आहे़ त्यामुळे ही माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे येत्या काही दिवसांत समजणार असले तरी क्रीडा क्षेत्रात याची चर्चा सुरु आहे़ (क्रीडा प्रतिनिधी)
रिक्त होणाऱ्या या जागेवर अनेकांचे डोळे आहेत़ त्यातच शेजारी असलेल्या नांदेडच्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचाही या जागेवर डोळा असल्याचे समजते़ लातूरच्या जिल्हा क्रीडा कार्यालयातील काही क्रीडा अधिकारीही आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत़ पुण्याच्या कार्यालयाकडून या बाबतचा अहवालही मागविण्यात आले असल्याचे समजले आहे़ क्रीडा खाते यासाठी प्रभारी माणूस देणार का, पूर्ण वेळ देणार हा ही विषय चर्चिला जात आहे़
शासनाचे आदेश, आॅर्डर अद्याप नाही़़़
४लातूर आणि वर्धा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश अवर सचिवांनी शुक्रवारी काढले आहेत़ मात्र त्यांना अद्यापी आॅर्डर मिळाली नाही़ येत्या दोन दिवसात त्यांना आॅर्डर मिळणार असल्याचे सुत्रांकडून कळते़ त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या अधिकाऱ्यांना आणखी दोन दिवसांचा अवधी फिल्डींग लावण्यासाठी मिळणार आहे़ तसे अनेकांचे प्रयत्नही सुरु आहेत़