हास्याच्या फवा-यांनी रंगला ‘एंटरटेनमेंट जबरदस्त’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:24 AM2017-11-21T00:24:51+5:302017-11-21T00:29:58+5:30
विनोदी धाटणीचे उखाणे, सिनेकलाकारांची मिमिक्री आणि सोबतीला बच्चे कंपनीचा धमाल डान्स शो, अशा रंगीबेरंगी कार्यक्रमांमुळे प्रेक्षकांनी रविवारी (दि.१९) लोकमत हॉल येथे झालेल्या ‘एंटरटेनमेंट जबरदस्त’ कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. ‘लोकमत’ आणि कलर्स वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : विनोदी धाटणीचे उखाणे, सिनेकलाकारांची मिमिक्री आणि सोबतीला बच्चे कंपनीचा धमाल डान्स शो, अशा रंगीबेरंगी कार्यक्रमांमुळे प्रेक्षकांनी रविवारी (दि.१९) लोकमत हॉल येथे झालेल्या ‘एंटरटेनमेंट जबरदस्त’ कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. ‘लोकमत’ आणि कलर्स वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यादरम्यान ‘लोकमत’च्या सर्व वाचकांसाठी तसेच सखी मंच, प्रिव्हिलेज मंच आणि कॅम्पस क्लबच्या सदस्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी विनोदी उखाणे, विनोदी चुटकुले स्पर्धा घेण्यात आली.
उखाणे स्पर्धेदरम्यान महिलांच्या बरोबरीने पुरुष स्पर्धकांनी दाखविलेला उत्साह अपूर्व होता. विनोदी उखाण्यांनी कार्यक्रमात एकच धूम केली.
स्पर्धकांनी काही आशयघन तर प्रसंगी मिश्किल विनोद निर्माण करून आपल्या जोडीदाराचे नाव घेऊन उपस्थितांची दाद मिळविली.
कार्यक्रमाच्या दुसºया सत्रात खास मुंबई येथून आलेले सुप्रसिद्ध मराठी विनोदी कलाकार प्रकाश भागवत यांनी गमतीदार किस्से सांगून सभागृहात हास्यांचे फवारे उडविले. त्यांच्या प्रत्येक विनोदाला पे्रक्षकांनी खळखळून दाद दिली. यामुळे सभागृहात जणू ‘हशा आणि टाळ्या’ असे धमाल वातावरण निर्माण झाले होते.
कलीम पटेल यांनी सिनेकलावंतांच्या मिमिक्री सादर करून उपस्थितांना खळखळून हसविले. यानंतर विनोदी चुटकुले स्पर्धेत स्पर्धकांनी सादरीकरण करून कार्यक्रम अधिक रंगतदार केला. नाट्यकर्मी शोभा दांडगे, महेश अचिंतलवार यांनी परीक्षकांची भूमिका पार पाडली.
विनय शर्मा आणि कलीम पटेल यांनी संचालन केले.