एक ऑक्टोबरपासून संतपीठातून अभ्यासक्रमाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:02 AM2021-09-12T04:02:12+5:302021-09-12T04:02:12+5:30

मंत्री संदीपान भुमरे : शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हाेणार उद्घाटन पैठण : संतपीठाचे मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी (१७ सप्टेंबर) मुख्यमंत्री उध्दव ...

Launching of the course from Santpeeth from October one | एक ऑक्टोबरपासून संतपीठातून अभ्यासक्रमाचा शुभारंभ

एक ऑक्टोबरपासून संतपीठातून अभ्यासक्रमाचा शुभारंभ

googlenewsNext

मंत्री संदीपान भुमरे : शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हाेणार उद्घाटन

पैठण : संतपीठाचे मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी (१७ सप्टेंबर) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन होणार असल्याची माहिती शनिवारी रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी पैठणमध्ये पत्रपरिषदेत दिली. १७ सप्टेंबरला उद्घाटन आणि १ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष अभ्यासक्रमाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संतपीठाच्या कामकाजास सुरुवात होणार असल्याने शनिवारी मंत्री संदीपान भुमरे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संतपीठातील भौतिक सुविधांचा आढावा घेतला.

राज्यभरात वारकरी संप्रदायाने मोठ्या संख्येने वारकरी शिक्षण संस्था सुरू केलेल्या आहेत. या संस्थांना संतपीठाची संलग्नता द्यावी म्हणून वारकरी संप्रदाय आग्रही आहे. त्यांना संतपीठाची संलग्नता देण्यासाठी युजीसी व शासनाची मान्यता घ्यावी लागणार असून याबाबत पालकमंत्री, उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व आपण पाठपुरावा करू असे मंत्री संदीपान भुमरे यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, राजीव शिंदे, सा.बां.चे उपविभागीय अभियंता राजेंद्र बोरकर, नाथसंस्थानचे विश्वस्त दादा बारे, हभप विठ्ठलशास्त्री चनघटे, दूध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, विनोद बोंबले, नगरसेवक भूषण कावसानकर, राजू गायकवाड, किशोर चौधरी, गणेश मडके, यांच्यासह विद्यापीठाचे प्रा. प्रवीण वक्ते आदी उपस्थित होते.

------

पाच परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाने शुभारंभ - मंत्री भुमरे

एक ऑक्टोबरपासून संतपीठातून वारकरी कीर्तन व एकनाथी भागवत हे दोन, एक वर्ष कालावधी असलेले परिचय प्रमाणपत्र निवासी अभ्यासक्रम आणि सहा महिने कालावधी असलेले संत एकनाथ महाराज, ज्ञानेश्वरी, गीता परिचय असे एकूण पाच अभ्यासक्रम सुरू होणार असल्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री भुमरे यांनी सांगितले. या अभ्यासक्रमास मिळणारा प्रतिसाद पाहून पुढे सर्वच संतांचा परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

--------

संतपीठाचे तीन विभाग

अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून संतपीठात संतसाहित्य, तत्त्वज्ञान व संगीत असे तीन विभाग तयार करण्यात आले आहेत. संतसाहित्य विभागातून परिचय प्रमाणपत्र, तत्त्वज्ञान विभागातून पीएच.डी., रिसर्च, डिग्री व डिप्लोमा अभ्यासक्रम तर संगीत विभागातून कीर्तन प्रवचन आदी अभ्यासक्रम असल्याचे विद्यापीठाचे प्रा. प्रवीण वक्ते यांनी सांगितले. संत साहित्याचा अभ्यास असणाऱ्या अभ्यासकाकडून पाच परिचय प्रमाणपत्रचा अभ्यासक्रम तयार केला आहे. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी संत साहित्याची आवड व ज्ञान असणाऱ्यांना प्रवेश मिळणार आहे.

-------

संतपीठाचा २३ कोटींचा प्रस्ताव सादर

संतपीठ हा मोठा व्यापक प्रकल्प असून यासंदर्भातील २३ कोटींचा प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. याअंतर्गत चार क्लस्टर क्लासरूम इमारत, जगभरातील संत साहित्य उपलब्ध असलेल्या सुसज्ज ग्रंथालयासह भौतिक सुविधांचा समावेश आहे. पुढे चालून संतपीठातून लोकशिक्षण, मूल्याधिष्ठित शिक्षण व बौध्दिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

-----------

सल्लागार समिती स्थापणार

सुरुवातीची पाच वर्षे संतपीठाचा कारभार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामार्फत चालणार आहे. त्यानंतर संतपीठ स्वतंत्र कामकाज करेल. दरम्यान, संतपीठासाठी स्थानिक सल्लागार व स्थायी समितीची निवड करण्यात येणार असल्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी स्पष्ट केले. तत्कालीन मुख्यमंत्री ए.आर अंतुले यांनी २३ जानेवारी १९८१ रोजी पैठणमध्ये संतपीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून पैठणकरांसह संत, महंत आणि वारकरी संप्रदाय संतपीठ सुरू होण्याच्या प्रतीक्षेत होते. चार वेळेस उद्घाटन होऊनसुध्दा संतपीठाच्या कामकाजास प्रारंभ झाला नव्हता. संदीपान भुमरे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर त्यांच्या पाठपुराव्यामुळे संतपीठ सुरू होण्याचा ४० वर्षांचा प्रवास संपुष्टात आला आहे.

---- फोटो कॅप्शन : पैठण येथील संतपीठाच्या कामकाजास सुरुवात होणार असल्याने त्याची पाहणी करताना रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी.

110921\img_20210911_164250.jpg

पैठण. संतपीठ ईमारतीची पाहणी करताना रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, व प्रशासकीय अधिकारी...

Web Title: Launching of the course from Santpeeth from October one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.