गुलाबाच्या पाकळ्या झाडून स्वच्छता प्रकल्पाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 12:44 AM2017-10-03T00:44:35+5:302017-10-03T00:44:35+5:30
मध्यवर्ती बसस्थानकात सोमवारी (दि.२) प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करताना खाली पडलेल्या गुलाबाच्या पाकळ्या झाडून संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकात सोमवारी (दि.२) प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करताना खाली पडलेल्या गुलाबाच्या पाकळ्या झाडून संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे जि.प. अध्यक्षांनी अस्वच्छ जागेत झाडू मारू, अशी सूचना केली; परंतु त्यांच्या सूचनेक डे एसटी महामंडळाच्या अधिकाºयांनी दुर्लक्ष करून शुभारंभाचा कार्यक्रम उरकून घेतला.
या प्रकल्पाच्या उद््घाटनप्रसंगी जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, उपमहापौर स्मिता घोगरे, एसटी महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक मधुकरराव पठारे, विभाग नियंत्रक राजेंद्र पाटील, यंत्र अभियंता रमेश लोखंडे, विभागीय अभियंता मिनल मोरे, मध्यवर्ती बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) स्वप्नील धनाड, स्थानकप्रमुख कृष्णा मुंजाळ, सिडको बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक ए. यू. पठाण, प्रमोद पवार, साईनाथ भालेराव, शिवाजी बोर्डे पाटील, दीपक बागलाने यांची उपस्थिती होती.
मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर हा कार्यक्रम झाला. प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रकल्पाची माहिती देणाºया फलकाचे फीत कापून लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता करायला सुरुवात केली; परंतु कार्यक्रमामुळे आधीच जागा चकाचक करण्यात आली होती. त्यामुळे अस्वच्छता नव्हती. तरीही त्याकडे दुर्लक्ष करून स्वच्छ जागेत झाडू मारायला सुरुवात केली. ही बाब देवयानी डोणगावकर यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी अस्वच्छ जागेत झाडू मारू, असे सांगितले; परंतु त्यांच्या म्हणण्याकडे महामंडळाच्या अधिकाºयांनी कानाडोळा करून झाडू मारणे सुरूच ठेवले. अशात प्रमुख अतिथींच्या स्वागतासाठी आणलेल्या गुलाबाच्या पाकळ्या खाली पडल्या होत्या.
दोन-चार झाडांची पानेही पडली होती. प्रमुख अतिथींना चक्क त्याच्यावर झाडू मारायला लावून अवघ्या काही मिनिटांत कार्यक्रम आटोपता घेण्यात आला. हा सर्व प्रकार पाहून प्रवाशांनी मात्र आश्चर्य व्यक्त केले.