'लॉ' चे विद्यार्थी चिंतेत; बॅकलाॅग आणि नियमित सत्र परीक्षेचे पेपर एकाच वेळी
By योगेश पायघन | Published: January 19, 2023 08:01 PM2023-01-19T20:01:00+5:302023-01-19T20:01:32+5:30
बीए-एलएलबी परीक्षेतील प्रकार, विद्यार्थ्यांना बॅकलाॅगच्या पेपरची संधी जाण्याची चिंता
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सत्र परीक्षा मंगळवारपासून सुरू झाल्या. बीए, एलएलबीच्या विद्यार्थ्यांचे बॅकलाॅगचे सहाव्या आणि नियमित नवव्या सत्राचे पेपर एकाच दिवशी आणि एकाच वेळी आले आहेत. हाॅलतिकीट वेळेवर न मिळाल्याने चर्चेत आलेल्या परीक्षा विभागाच्या चुकांमुळे विद्यार्थी गोंधळात पडले आहेत.
व्ही. एन. पाटील विधी महाविद्यालयात शुभम ठाकूर हा विद्यार्थी बीए, एलएलबीच्या पाचव्या वर्षात शिकत आहे. सध्या त्याच्या नवव्या सत्राचे नियमित परीक्षेचे वेळापत्रक आणि सहाव्या सत्राच्या बॅकलाॅगच्या पेपरचे वेळापत्रक एकाच वेळी आल्याने त्याने परीक्षा विभागात धाव घेतली. त्यातील दोन विषयांच्या वेळापत्रकातील अडचणी सुटल्या. मात्र, फॅमिली लाॅ हा सहाव्या सत्राचा पेपर २५ जानेवारी रोजी सकाळी १० ते १ वाजेदरम्यान आहे. त्याचवेळी त्याचा नव्या सत्राचा लॅण्ड लॉ इन्क्ल्युडिंग टेन्युअर ॲण्ड टेनन्सी लाॅ विषयाचा थिअरी पेपर आहे. दोन्ही पेपर एकाच वेळी आल्याने एक पेपर हुकणार असल्याने या विद्यार्थ्याने वेळापत्रकात तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क वेळेत न भरल्याने विद्यार्थ्यांना पीएनआर नंबरवर परीक्षा देण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे वेळेत शुल्क न भरणाऱ्या सहा विधी महाविद्यालयांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आली आहे. प्राचार्य परीक्षा विभागावर, तर विद्यापीठ प्रशासन महाविद्यालयांवर गोंधळाचे खापर फोडत आहे. मात्र, या घोळात परीक्षेतील गोंधळ सुटलेला नसून विद्यार्थ्यांना मात्र, परीक्षेत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याविषयी विद्यापीठ प्रशासनाकडे विचारणा केली असता प्रतिसाद मिळाला नाही.