विधि विद्यापीठ देणार नागरिकांना कायद्याचा मोफत सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 07:48 PM2020-02-14T19:48:16+5:302020-02-14T19:48:48+5:30
नागरिकांच्या मदतीसाठी ‘विधि सहायता केंद्रा’ची स्थापना होणार
- राम शिनगारे
औरंगाबाद : महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठात सर्वसामान्यांना कायदेविषयक मोफत सल्ला देण्यासाठी ‘विधि सहायता केंद्र’ स्थापन करण्यास मंजुरी मिळाली आहे. या केंद्राचे उद्घाटन ८ मार्च रोजी होईल, अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अशोक वडजे यांनी दिली.
शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये सुरू झालेल्या विद्यापीठाची स्वतंत्र इमारत कांचनवाडी परिसरात बांधण्यात येत आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याबरोबरच विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. या ‘विधि सहायता केंद्रा’ चे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या केंद्राच्या संचलनासाठी न्यायालयामधील ‘विधि सेवा समिती’च्या मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेतला जाईल. कोणताही व्यक्ती केंद्रात येऊन कायद्याविषयी सल्ला मागू शकतो. एखाद्या प्रकरणात गंभीर गुन्हा केलेला आरोपी सल्ला मागण्यासाठी आल्यास त्यास केवळ जामीन मिळविण्याचा अधिकार असल्याचे सांगण्यात येईल. यासंदर्भात न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन केले जाईल. तसेच हा सल्ला देताना कायद्याच्या पळवाटा मात्र सांगितल्या जाणार नाहीत, असेही डॉ. वडजे यांनी सांगितले.
पॅरा लीगल व्हॉलेंटिअरची नेमणूक होणार
विधि सहायता केंद्रात विद्यार्थ्यांची नेमणूक पॅरा लीगल व्हॉलेंटिअर म्हणून केली जाणार आहे. कोणतीही व्यक्ती विधि सल्ला मागण्यासाठी आल्यानंतर त्यास योग्य तो सल्ला देण्यासाठी विद्यार्थ्यांना संबंधित केसचा अभ्यास करावा लागेल. तसेच त्या केससंदर्भात न्यायालयात घडणाऱ्या घडामोडींची माहिती ठेवावी लागेल.न्यायालयाची आॅर्डर काय झाली. त्याचा अर्थ काय निघतो. याविषयीचा अभ्यास करून संबंधित व्यक्तीला सल्ला मिळेल. यासाठी न्यायालयातील ‘विधि सेवा समिती’ची मदत होईल, असेही डॉ. वडजे यांनी सांगितले.