एलबीटीच्या बैठकीला महापौरांची दांडी!
By Admin | Published: June 11, 2014 12:38 AM2014-06-11T00:38:37+5:302014-06-11T00:51:55+5:30
औरंगाबाद : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील सर्व महापालिका महापौर, आयुक्तांची मुंबईत एलबीटी विषयाला अनुसरून महत्त्वाची बैठक आज घेतली.
औरंगाबाद : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील सर्व महापालिका महापौर, आयुक्तांची मुंबईत एलबीटी विषयाला अनुसरून महत्त्वाची बैठक आज घेतली. त्या बैठकीला औरंगाबाद पालिकेच्या महापौर कला ओझा यांनी खाजगी कारणामुळे दांडी मारली. आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे हे एकटेच बैठकीला गेले होते. मनपाची आर्थिक परिस्थिती कशी आहे. निधीची गरज किती आहे. हे महापौरांनी मांडणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी बैठकीला हजेरीच लावली नाही.
राज्यातील व्यापाऱ्यांचा एलबीटीला विरोध असल्यामुळे आज शासनाने बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्या बैठकीत अनेक महापौरांनी एलबीटी सुरू ठेवण्याची भूमिका घेतली. मनपा हद्दीतील व्यापाऱ्यांनी एक महिन्यापासून एलबीटी भरण्यास विरोध सुरू केला आहे. १० रुपये एलबीटी भरण्याची भूमिका येथील व्यापाऱ्यांनी घेतली आहे, तर कर्मचाऱ्यांनी एलबीटी बंद करू नये यासाठी काळ्या फिती लावून आंदोलन केले.
महापौर म्हणाल्या...
महापौर कला ओझा म्हणाल्या की, खाजगी कामानिमित्त बाहेरगावी जावे लागले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडील एलबीटीच्या बैठकीला जाता आले नाही. तसेही आज काही निर्णय झाला नसल्याची माहिती मिळाली आहे; परंतु मुख्यमंत्र्यांना एलबीटी प्रकरणात फॅ क्स पाठविला. एलबीटी, जकात किंवा शासन निधी यापैकी एक पर्याय उपलब्ध झाल्यास पालिकेचा खर्च भागेल. एलबीटी बंद करण्याची भूमिका शासन घेत असेल तर मनपाच्या उत्पन्नाची पर्यायी तरतूद करण्याची मागणी त्या पत्रातून केली आहे.
विकासकामांच्या संचिका तुंबल्या
पालिकेचे उत्पन्न घटल्यामुळे विकासकामांच्या संचिका सध्या थांबविण्यात आल्या आहेत. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अंदाजपत्रक, निविदांची कामे थांबविण्यात आली आहेत. असे सांगितले जात असले तरी त्यामागे मनपाचे उत्पन्न कमी झाल्याचे मुख्य कारण असल्याचे सूत्रांनी सांगितले.