‘एलबीटी’ माफ करता; मग कर्जमाफी का नको?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2016 12:28 AM2016-06-05T00:28:37+5:302016-06-05T00:37:00+5:30

उस्मानाबाद : केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार हे मुठभर लोकांसाठी काम करीत आहे. सत्तेवर येताच या सरकारने ‘एलबीटी’ माफ करून व्यापाऱ्यांना खुश केले.

'LBT' waives; Then why not do debt forgiveness? | ‘एलबीटी’ माफ करता; मग कर्जमाफी का नको?

‘एलबीटी’ माफ करता; मग कर्जमाफी का नको?

googlenewsNext


उस्मानाबाद : केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार हे मुठभर लोकांसाठी काम करीत आहे. सत्तेवर येताच या सरकारने ‘एलबीटी’ माफ करून व्यापाऱ्यांना खुश केले. विजय मल्ल्यासारखी मंडळी ९ हजार कोटी बुडवून परदेशात निघून जातात. दुसरीकडे तीन-चार वर्षांपासून सातत्याने भीषण दुष्काळाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास हे सरकार तयार नाही. हे कशाचे निदर्शक आहे. अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सेना-भाजपाला शेतकरीविरोधी ठरविले.
जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने शनिवारी पवार यांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मंचावर आमदार राणाजगजितसिंह पाटील, आ. राहुल मोटे, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, जीवनराव गोरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, उस्मानाबाद पालिकेचे नगराध्यक्ष संपत डोके, तुळजापूर पालिकेच्या नगराध्यक्षा अ‍ॅड. मंजुषा मगर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवदास कांबळे, जि.प.तील राष्ट्रवादीचे गटनेते महेंद्र धुरगुडे आदींची उपस्थिती होती.
अजित पवार म्हणाले की, वाट्टेल तसे आरोप करून आणि ‘अच्छे दिन आनेवाले है’, असे सांगत भाजप सत्तेत आली. परंतु, सरकारच्या दोन वर्षातील कार्यपद्धतीमुळे जनतेचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. दुष्काळातही शासनाचा भक्कम आधार मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलित असल्याचे सांगत, सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत रझाकाराप्रमाणे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला. चारा नसतानाही प्रशासनाच्या अहवालाचा हवाला देत छावण्या बंद करण्याचे आदेश काढले. परंतु, दुष्काळी भागातून पशुपालकांसह शेतकऱ्यांचा उठाव झाल्यानंतर शासनाने यु-टर्न घेतल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कळत नसल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस हा शेतकऱ्यांचा पक्ष आहे. शरद पवार हे सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करतात. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना तब्बल ७२ हजार कोटींची कर्जमाफी मिळाली. परंतु, भाजप सरकार कर्जमाफीचा फायदा बँकांना होत असल्याचे सांगत कर्जमाफी देण्यास टाळाटाळ करीत आहे. विरोधकांनी ही मागणी लावून धरल्यानंतर ‘योग्यवेळी कर्जमाफी देऊ’ असे प्रत्येकवेळा सांगितले जाते. त्यामुळे या सरकारची ‘योग्य वेळ येणार कधी?’ असा सवालही त्यांनी केला. शेतकऱ्यांनी सरकारच्या ‘योग्य वेळे’ची वाट न बघता ‘सरकारलाच योग्य वेळी वाट (रस्ता) दाखवावी, अशी खोचक टिप्पनीही त्यांनी केली. दरम्यान, या कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरूपात प्रत्येक तालुक्यातील दोन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना पवार यांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात आले. यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील, जीवनराव गोरे, आ. राहुल मोटे यांचीही भाषणे झाली.
दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबाद आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा केली होती. यापैकी उस्मानाबादसाठी साडेपाचशे कोटी मिळणार होते. तसा शासन आदेशही काढण्यात आला. परंतु, त्याची अंमलबजावणी शुन्य आहे. तीन-चार वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडून पडले आहे. परिणामी शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलित आहेत. असे असतानाही शासन ठोस पाऊले उचलीत नसल्याचा आरोप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केला. दुष्काळ पाहणी करण्यासाठी पथके येतात अन् निघून जातात. मात्र, मदत काहीच मिळत नसल्याचेही ते म्हणाले. टंचाई निवारणार्थ टँकर, अधिग्रहणे करण्यात आली. परंतु, याचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: 'LBT' waives; Then why not do debt forgiveness?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.