उस्मानपुऱ्यातील औषधी दुकान फोडणाऱ्या टोळीचा म्होरक्या गुन्हे शाखेने पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:33 AM2020-12-17T04:33:44+5:302020-12-17T04:33:44+5:30
दीपकसिंग प्रल्हादसिंग टाक (रा. जालना) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, २१ नोव्हेंबरच्या रात्री ३:२० ते ३:४० ...
दीपकसिंग प्रल्हादसिंग टाक (रा. जालना) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, २१ नोव्हेंबरच्या रात्री ३:२० ते ३:४० वाजेच्या सुमारास चोरट्यानी उस्मानपुरा येथील शिवगंगा मेडिकल स्टोअर फोडून रोख रक्कमेसह ७२ हजाराचा ऐवज पळविला होता. कल्पना अशोक तपसे यांच्या तक्रारीवरुन उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. चोरी करणारे तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपीनी स्टील कटरने शटर तोडून ही चोरी केली होती.
चोरी करण्यासाठी ज्या कारचा चोरट्यांनी वापर केला ती कार त्यांनी मुकुंदवाडी परिसरातून चोरी केली होती. ती कार त्यांनी जालना येथे बेवारस अवस्थेत सोडून दिल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले. जालना येथील अट्टल गुन्हेगार दीपकसिंग टाक याने ही चोरी केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हे शाखा पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी खबऱ्यांना कामाला लावले. मंगळवारी रात्री तो घरी आल्याचे समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे आणि कर्मचाऱ्यांनी जालना येथे जाऊन त्याला पकडून आणले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत ही चोरी दोन साथीदारांच्या मदतीने केल्याचे सांगितले. शिवाय बिडकीन जवळील धुपखेडा येथील मंदिरात त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले. त्याचे साथीदार अर्जुनसिंग भादा आणि सागरसिंग बावरी हे फरार असून त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. गुन्हा करण्यासाठी वापरलेले स्टील कटर पोलिसांनी जप्त केले. आरोपी दीपकसिंग हा जालना जिल्ह्यातून तडीपार आहे.