सर्वसामान्यांसाठी पहाड फोडणारा नेता हरपला़़़
By Admin | Published: January 24, 2017 10:34 PM2017-01-24T22:34:37+5:302017-01-24T22:36:38+5:30
उदगीर जनसामान्यांच्या प्रश्नांना, प्रसंगी आक्रमक मार्ग स्वीकारुन तडीस लावणारा नेता... अशी चंद्रशेखर भोसले यांची ओळख होती़
व्ही.एस. कुलकर्णी उदगीर
लोकांच्या मनाची नाडी ओळखून जनसामान्यांच्या प्रश्नांना, प्रसंगी आक्रमक मार्ग स्वीकारुन तडीस लावणारा नेता... अशी माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांची ओळख होती़ जनतेच्या प्रश्नांसाठी वेगवेगळी आयुधे वापरत प्रसंगी पहाड फोडणाऱ्या या नेत्याचा वाढदिवस म्हणजे एक वार्षिक उत्सव बनला होता़ राजकीय बळ नसताना स्वकर्तृत्वावर झेप घेऊन नगर परिषद ते विधान भवनापर्यंत मजल मारली. सर्वसामान्यांसाठी पहाड फोडणारा हा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविताना त्यांनी संघटनेला विधायक वळण देत विद्यापीठ पातळीवरची पदे भूषविली़ क्रीडा क्षेत्रात अधिक रस असलेल्या भोसले यांनी प्रियदर्शिनी युवक मंडळाची स्थापना करुन संस्मरणीय अशा राज्य व अखिल भारतीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा घडवून आणल्या़ भोसले यांच्या कार्याची राज्य शासनाने दखल घेऊन त्यांना शिवछत्रपती पुरस्काराने गौरविले होते़ हे करीत असतानाच मोठे बंधू कै़ विलास भोसले यांच्या आकस्मित निधनाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली होती़ अशातच उदगीर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्या कार्याची कक्षा वाढविली़ नगर परिषदेच्या राजकारणातील त्यांची धडाडी व संघटन कौशल्य पाहून उदगीरचे तत्कालीन आमदार कै़ नारायणराव पाटील गुडसूरकर यांनी भोसले यांना नगर परिषदेत अधिक गुंतवून न ठेवता त्यांना सोबत घेऊन चंद्रशेखर भोसले हेच उदगीर मतदारसंघाचे उद्याचे नेतृत्व असल्याचे एका जाहीर सभेतून ठणकावून सांगितले होते़
हा सल्ला मानून भोसले यांनी गावागावांतून कै़ विलास भोसले मित्रमंडळाच्या शाखा स्थापन केल्या़ या शाखेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी गावोगावी पशुरोग निदान शिबिरे आयोजित करुन शेतकऱ्यांचे व लोकांचे अडले नडलेले प्रश्न सोडवू लागले़ गावातल्या या शाखा म्हणजे गरजू लोकांची ही मदत केंद्रे ठरली होती़ हे कार्य चालू असतानाच प्रेरणास्थान असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अखिल भारतीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांना व हाकेला ओ देण्याचे काम भोसले यांनी सातत्याने केले़ विकास नाही म्हणून ओरडत बसण्यापेक्षा विकसितांचा अभ्यास करुन त्यांच्या पाऊलवाटेवर चालण्याचा संकल्प चंद्रशेखर भोसले यांनी आमदारकीच्या प्रारंभीच व्यक्त केला होता़ त्या दृष्टीने होणारी त्यांची वाटचाल मतदारांना दिलासा देणारी ठरली होती़
जनता दल, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अशा विविध पक्षात राहून काम केल्यानंतर त्यांनी जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले तत्कालीन केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता़ जनतेच्या प्रश्नासाठी पहाड फोडण्याचे प्रयत्न करणाऱ्या या नेत्याला मंगळवारी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला़