महापालिका निवडणुकीसाठी नेत्यांची पावले महाविकास आघाडीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 07:49 PM2020-02-18T19:49:25+5:302020-02-18T19:52:53+5:30
तीनही पक्षांच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची आघाडी करून निवडणूक लढविण्याची मानसिकता
- स. सो. खंडाळकर
औरंगाबाद : यावेळी मनपाच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस वेगळेवेगळे लढण्याची शक्यता कमी दिसते. तीनही पक्षांच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची आघाडी करून निवडणूक लढविण्याची मानसिकता असली तरी काँग्रेसला एकूण जागांमध्ये चांगल्या जागा हव्या आहेत. सध्या वॉर्डांवरच्या हरकती व आक्षेपांच्या सुनावणीकडे सर्वच पक्षांचे लक्ष असून, त्यानंतर राजकीय हालचालींना वेग येईल.
येत्या २० फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर हे औरंगाबादला येत आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीच्या हालचालींना वेग येईल. अलीकडेच घोसाळकर यांनी महाविकास आघाडीच्या दृष्टीने एक पाऊल उचलून महापौर बंगल्यावर तीनही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सध्या शिवसेनेचे ३० नगरसेवक आहेत. काँग्रेसचे ११ आणि राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक आहेत. एवढ्या जागा ज्या त्या पक्षाच्या शाबूत राहतील. ज्या वॉर्डात दोन नंबरवर जे पक्ष राहिले, त्याही जागा त्या- त्या पक्षाला द्याव्यात, असा फार्म्युला घोसाळकर यांनी मांडला होता. मात्र काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार यांना हा फार्म्युला मान्य नाही. २०१५ साली मनपाची निवडणूक झाली. आता २०२० मध्ये परिस्थिती खूप बदलली आहे. त्यामुळे त्या- त्या वॉर्डात ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासारखा असेल, त्याला ती जागा सोडण्यात यावी. काँग्रेसला सन्मानपूर्वक ५० टक्के जागा मिळाव्यात, असा आग्रह पवार यांनी धरला. नक्की फार्म्युला अद्याप ठरलेला नाही. तो तीनही पक्षांचे श्रेष्ठीच ठरवतील.
६५ वॉर्डांत समित्या तयार
मनपा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसने गेल्या काही दिवसांपासून गती वाढविली आहे. मुंबईत प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतलेल्या बैठकीत प्रत्येक वॉर्डात अकरा जणांची एक समिती स्थापन करण्याचे ठरले होते. त्यानुसार आतापर्यंत एकूण ६५ वॉर्डांमध्ये अकरा जणांच्या समित्या स्थापन झाल्या आहेत. उरलेल्या वॉर्डांत लवकरच या समित्या अस्तित्वात येतील, असे पवार यांनी सांगितले. गेल्या १३ फेबु्रवारीपासून काँग्रेसने इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्जांचे वाटप सुरू केले आहे. २३ फेब्रुवारीपर्यंत हे अर्ज वाटप केले जातील. गांधी भवन आणि शहराध्यक्षांचे कार्यालय, निराला बाजार येथून आतापर्यंत ३० अर्जांचे वाटप झालेले आहे. वॉर्डांच्या हरकती व आक्षेपांच्या सुनावणीमुळे व आज रविवार असल्यामुळे अर्जांचे वाटप होऊ शकले नाही. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी सांगितले की, मनपा निवडणुकीत महाविकास आघाडी करण्यासाठी प्रत्येक पक्षाने एक समिती स्थापन करण्याचे ठरले आहे. लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अशी समिती स्थापन करणार आहे. काँग्रेसही करील. राष्ट्रवादी काँग्रेसही उमेदवारी अर्ज मागवून घेणार आहेत. एक दोन दिवसांत या कामाला गती मिळेल.
भाजपला खिंडार पडेल
महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले की, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर २० फेब्रुवारी रोजी औरंगाबादला येत आहेत. दरम्यान भाजपला मोठे खिंडार पडणार आहे. गजानन बारवाल यांनी उद्धव ठाकरे यांना भेटून शिवसेना प्रवेशाचे संकेत दिलेले आहेत. अन्य मंडळीही वाटेवर आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांची मानसिकता महाविकास आघाडी करून मनपा निवडणूक लढवावी, अशी झालेली आहे. नक्की फार्म्युला तीनही पक्षांच्या श्रेष्ठींच्या बैठकीत ठरेल, असे घोडेले यांनी सांगितले.