नेत्यांनो, सातारा- देवळाईतून गुंठेवारी हद्दपार करणार की नाही? नागरिकांचा संतप्त सवाल
By साहेबराव हिवराळे | Published: May 2, 2024 07:57 PM2024-05-02T19:57:07+5:302024-05-02T19:57:18+5:30
नागरिकांत ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाराजीचा सूर
छत्रपती संभाजीनगर : कष्टाची पै-पै जमा करून म्हणजे आयुष्याची पुंजी साठवून बांधलेला हा आमचा निवारा आहे. सातारा- देवळाई ग्रामपंचायतीपासून आम्ही कर भरतो, आता मनपालाही कर देतो. मग गुंठेवारी कशासाठी? नेत्यांनो, गुंठेवारी हद्दपारी करणार की नाही, असा संतप्त सवाल नागरिकांनी व्यक्त केला.
शनिवारी सायंकाळी गुंठेवारीच्या विरोधासाठी श्रीराम मंदिर, रामविजय सहकारी गृहनिर्माण संस्था, अलोकनगर येथे बैठक घेण्यात आली. प्रास्ताविक राजेंद्र फिरोदिया यांनी केले. प्रा. एकनाथ साळुंके यांनी आंदोलन तीव्र करावे, असे मत व्यक्त केले. माजी सैनिक मोहन सोन्नेकर, आर डी. भुकेले, दीपक कुलकर्णी, इंजि. उद्धव डंबाळे, विष्णू तांबट यांनीही सूचना मांडल्या. गुंठेवारी रद्द करण्यासाठी एकजुटीचे आवाहन रवींद्र पिंगळीकर यांनी केले.
शांततामय मार्गाने आंदोलन
सर्व राजकीय पक्षांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. आम्ही प्रश्न सोडवू असे म्हणत आहेत. आम्ही शांततामय मार्गाने आंदोलन करत असताना मनपा आयुक्त आमच्या शिष्टमंडळाशी फार तिरस्काराने बोलले, याचा आम्ही निषेध करीत आहोत.
- स्मिता अवचार, रहिवासी
मध्यमवर्गीय लोकांची प्रचंड हालअपेष्टा
सातारा देवळाई परिसराला जी किंमत आली आहे, ती आम्ही मध्यमवर्गीय लोकांनी प्रचंड हालअपेष्टा सहन करून येथे टिकून राहिल्यामुळे, पण गुंठेवारीच्या नावाखाली प्रचंड दंड वसूल केला जातोय. गेली ७ वर्षे मनपा टॅक्स घेतेय, पण पाणी, ड्रेनेज रस्ते द्यायचे नाव नाही. गुंठेवारी करा म्हणते, एकेका नागरिकाला गुंठेवारी करायला भाग पाडते.
- नामदेव बाजड, रहिवासी.