पालेभाज्या, दूधपुरवठ्यावर परिणाम

By Admin | Published: June 3, 2017 12:47 AM2017-06-03T00:47:05+5:302017-06-03T00:47:58+5:30

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी शहरात पालेभाज्या व फळभाज्यांच्या पुरवठ्यावर परिणाम जाणवला.

Leafy vegetables, milk yield results | पालेभाज्या, दूधपुरवठ्यावर परिणाम

पालेभाज्या, दूधपुरवठ्यावर परिणाम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी शहरात पालेभाज्या व फळभाज्यांच्या पुरवठ्यावर परिणाम जाणवला. विक्रेत्यांनी आपल्याकडील शिल्लक फळभाज्यांचीच दुप्पट भावात विक्री केली, तर नेहमीपेक्षा ६५ हजार लिटरने दूध संकलन घटले होते. मात्र, फळभाज्या व दूध सहज मिळत असल्याने जनजीवनावर परिणाम जाणवला नाही. मात्र, संप सुरूराहिला तर उद्या शनिवारी तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शुक्रवारी जाधववाडी येथील फळभाज्यांच्या अडत बाजाराला साप्ताहिक सुटी होती. यामुळे जिल्ह्यातून व परजिल्ह्यांतून दररोज येणारे ८० ते ९० टन फळ व पालेभाज्यांची आवक आज झाली नाही. परिणामी भाजीमंडईत श्रावण घेवडा २०० रुपये, दोडके १०० रुपये, भेंडी, कारले, ६० रुपये तर फुलकोबी, दोडके ५० रुपये किलो, टमाटे ४० रुपये प्रतिकिलो अशा दुप्पट भावात भाज्या विकण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे संप लक्षात घेऊन विक्रेत्यांनी मागील दोन दिवसांत फळभाज्यांचा साठा करून ठेवला आहे. या कृत्रिम तेजीचा फायदा शेतकऱ्यांना किती होतो हे माहीत नाही; पण व्यापारी मात्र संपाचा संपूर्ण फायदा उचलत उखळ पांढरे करून घेत आहेत.
होलसेल व्यापाऱ्यांनी सांगितले की, शहरात आजघडीला २० ते २५ टन पाले-फळभाज्यांचा साठा आहे. मात्र, शनिवारी या भाज्या विक्री होतील. जाधववाडीत परजिल्ह्यांतून फळभाज्या आल्या नाही, तर तुटवडा जाणवायला लागेल व शिल्लक असलेल्या भाज्यांचे भाव विक्रेते आणखी वाढवतील. तसे काही शेतकऱ्यांनी आज पहाटे व दुपारी दुचाकीवर पालेभाज्या आणून त्या औरंगपुरा व अन्य भाजीमंडईत विकल्या. यामुळे काही विक्रेत्यांकडे ताज्या भाज्या दिसून आल्या; पण त्याचे प्रमाण कमी होते. शहरात दररोज पाकीट बंद सुमारे दीड लाख लिटर दुधाची विक्री होत असते. मात्र, जिल्ह्यातील दूध संकलन कमी झाले व परजिल्ह्यांतून होणारा दूध पुरवठा घटल्याने सुमारे ८५ हजार लिटर दूध विक्रीस उपलब्ध झाले. तसेच दुधवाल्या भय्यांनीही नेहमीप्रमाणे घरपोच दूध आणून दिले. ग्राहकांना दूध सहज मिळत असल्याने दुधाच्या टंचाईचा परिणाम जाणवला नाही.
शहरात जिल्ह्यातूनच नव्हे, तर नगर, कोपरगाव, जळगाव आदी जिल्ह्यांतील विविध दूधडेअरींकडून दुधाचा पुरवठा होतो. गुरुवारपासूनच दुधडेअरीवरील दूध संकलनावर परिणाम जाणवू लागला होता. यामुळे गुरुवारी सकाळी नेहमीपेक्षा सुमारे ३० हजार लिटर दूध कमी आले. आज संपाच्या दुसऱ्या दिवशी हाच आकडा ६५ हजार लिटरपर्यंत जाऊन पोहोचला. शहरातील देवगिरी महानंदाचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप पाटील यांनी सांगितले की, आमचे जिल्ह्यात पाच ठिकाणी दूध संकलन केंद्र आहे. दररोज सकाळी सध्या ५६ हजार लिटर, तर सायंकाळी ३५ हजार लिटर दूध संकलन होत असते. संपाच्या पहिल्या दिवशी आमच्याकडील दुधाचे संकलन १६ हजार लिटरने घटले होते. आज आणखी संकलन कमी होऊन सकाळी २१ हजार लिटरने दूध संकलन कमी झाले, अशीच परिस्थिती राहिली तर रविवारपर्यंत निश्चित दूध पुरवठ्यावर मोठा परिणाम जाणवेल, असेही त्यांनी नमूद केले.
परजिल्ह्यातून येणाऱ्या ५० ते ७५ हजार लिटर दुधापैकी आज निम्मेच दूध विक्रीला आले होते.

Web Title: Leafy vegetables, milk yield results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.