वडगावच्या मुख्य जलवाहिनीला महावीर चौकात गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 10:30 PM2019-05-16T22:30:18+5:302019-05-16T22:30:44+5:30
वडगाव कोल्हाटी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला पंढरपुरातील महावीर चौकात गळती लागली आहे.
वाळूज महानगर: वडगाव कोल्हाटी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला पंढरपुरातील महावीर चौकात गळती लागली आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. टंचाईच्या काळात पाण्याची नासाडी होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीने एमआयडीसीच्या बजजा गेट जवळील जलकुंभापासून पंढरपूर, बजाजनगर मार्गे वडगाव जलकुंभा पर्यंत पाण्याची पाईपलाईन टाकली आहे. मोरे चौक रस्ता रुंदीकरण व सुशोभिकरणाचे काम करताना महावीर चौकात मुख्य जलवाहीनी फुटली आहे. तेव्हापासून या ठिकाणी जलवाहिनीला गळती सुरु आहे. मात्र या गळतीकडे प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे.
त्यामुळे या ठिकाणी दररोज शेकडो लीटर पाणी वाहून जात आहे. एकीकडे गावातील नागरिकांचे भीषण टंचाईमुळे हाल होत असून, पाण्यासाठी मारामारीची वेळ आली आहे. हंडाभर पाण्यासाठी भर उन्हात दीड ते दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नाहक दररोज शेकडो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. टंचाईच्या काळात पाण्याची नासाडी होत असल्याने नागरिकांमधून प्रशासनाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे.