जाणून घ्या छत्रपती संभाजीनगरातील १८०० सालच्या चिमणाराजाची हवेलीबद्दल; पालिकेने अतिक्रमणाने केली जमीनदोस्त!

By मुजीब देवणीकर | Published: June 9, 2023 07:56 PM2023-06-09T19:56:26+5:302023-06-09T19:57:26+5:30

चारही बाजूने पोलिसांचा वेढा : तणाव वाढताच कारवाई थांबविली

Learn about the 1800-year-old Chimnaraja's Haveli in Chhatrapati Sambhajinagar; The municipality did land destruction by encroachment! | जाणून घ्या छत्रपती संभाजीनगरातील १८०० सालच्या चिमणाराजाची हवेलीबद्दल; पालिकेने अतिक्रमणाने केली जमीनदोस्त!

जाणून घ्या छत्रपती संभाजीनगरातील १८०० सालच्या चिमणाराजाची हवेलीबद्दल; पालिकेने अतिक्रमणाने केली जमीनदोस्त!

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक जामा मशीद परिसराजवळील चिमणाराजा हवेलीच्या जागेवरील सुमारे १७ अतिक्रमणे गुरुवारी (दि. ८) महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने जमीनदोस्त केली. सकाळी ७ वाजेपासून या परिसरात पोलिसांनी वेढा घातला होता. हवेलीच्या आसपासचे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. दुपारी २ वाजेपर्यंत जवळपास सर्व अतिक्रमणे पाडली होती. एका भंगार विक्रेत्याची प्रकृती खालावल्यावर कारवाई थांबविण्यात आली.

चिमणाराजा यांची हवेली सुमारे दहा ते बारा एकर परिसरात होती. त्यातील काही जागेवर घरे बांधण्यात आली आहेत. उर्वरित जागा अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी २०१२ मध्ये खरेदीखत करून घेतली. त्यांच्यातर्फे अजंता कन्स्ट्रक्शन कंपनीने २०१५ मध्ये महापालिकेकडून वॉल कंपाउंड बांधण्यासाठी परवानगी घेतली. २०१६ मध्ये जागेचा ताबा घेण्यावरून दोन गटात वाद निर्माण झाला. तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दोन्ही गटांना बंदी केली होती. हवेलीच्या परिसरात महापालिकेची एक आरक्षित जागा आहे. प्ले ग्राउंडसाठी असलेली जागा कोणती याचा शोध महापालिकेकडून घेण्यात येतोय. याशिवाय हवेलीच्या बाजूने एक वीस फूट रुंद रस्ता दर्शविण्यात आला आहे. दरम्यान, आज सकाळी ७ वाजता या भागात मोठा पोलिस फाटा आणि महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक दाखल झाले. हवेलीच्या जागेवरील लहानमोठी अतिक्रमणे दुपारी १ वाजेपर्यंत काढण्यात आली. या कारवाईत कोणताही अडथळा सुरुवातीला झाला नाही.

भंगार विक्रेत्याने दाखवली मालकी
हवेलीच्या जागेवर पाच हजार चौरस फुटाची जागा आमची असल्याचा दावा एका भंगार विक्रेत्याने केला. त्याने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांना पीआर कार्ड दाखविला. यावेळी थोडासा तणाव निर्माण झाला. भंगार विक्रेत्याचे बीपी वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर महापालिकेने कारवाई थांबविली. ही कारवाई उपायुक्त सविता सोनवणे, इमारत निरीक्षक सय्यद जमशेद, देसाई, गवळी आदींनी केली.

खंडपीठात धाव
हवेलीच्या काही जागेवर मालकी हक्काचा दावा करणाऱ्या नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली होती. खंडपीठाने त्यांना दिवाणी दावा दाखल करण्याचे आदेश दिले. महापालिकेने पुढील ४५ दिवस कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देश दिले असल्याचे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले.

चिमणाराजा कोण होते?
इ.स. १८०० मध्ये निजाम राजवटीतील नवाब सिकंदर यांच्या कार्यकाळात राजा शामराज बहादूर यांना त्या काळात दफ्तर-ए-दिवानी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. अर्ध्याहून अधिक शहरावर त्यांची मालकी होती. त्यांचा मुलगा चिमणाराजा याच्यासाठी खास जामा मशीदच्या पाठीमागे भव्य हवेली उभारली होती. १८३४ मध्ये राजा शामराज बहादूर यांचे निधन झाले. त्यानंतर अनेक वर्ष त्यांचा मुलगा चिमणाराजा पुढील कारभार सांभाळत होता. कालांतराने त्यांची हवेली ओस पडत गेली.

Web Title: Learn about the 1800-year-old Chimnaraja's Haveli in Chhatrapati Sambhajinagar; The municipality did land destruction by encroachment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.