उणिवांवर मात करायला शिका -इरा सिंघाल
By Admin | Published: April 24, 2016 11:28 PM2016-04-24T23:28:50+5:302016-04-25T00:44:37+5:30
औरंगाबाद : आधी मी बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करीत होते. चांगले काम, उत्तम पगार असूनही त्या ठिकाणी मन रमले नाही. मला या व्यवस्थेत काही तरी बदल घडवायचा होता
औरंगाबाद : आधी मी बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करीत होते. चांगले काम, उत्तम पगार असूनही त्या ठिकाणी मन रमले नाही. मला या व्यवस्थेत काही तरी बदल घडवायचा होता. समाजासाठी काही तरी करायचे होते, त्याच पे्ररणेने २००९ साली मी नोकरी सोडली आणि आयएएस परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली, असे मत स्वत:च्या शारीरिक अपंगत्वावर मात करून अतिशय खडतर समजल्या जाणाऱ्या आयएएस परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या इरा सिंघाल यांनी व्यक्त केले. एका खाजगी कार्यक्रमासाठी त्या शहरात आल्या असताना विविध स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी रविवारी मार्गदर्शन केले.
लहानपणापासूनच ‘स्कोलियासिस’ या पाठीच्या कण्याशी निगडित आजारपणामुळे इरा यांना अपंगत्व आले व हाताच्या हालचालींवर मर्यादा आल्या. अशा कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी अभियांत्रिकी पदवी मिळविली व एमबीएदेखील केले. याविषयी सांगताना त्या म्हणाल्या, माझ्यात काही तरी कमी आहे म्हणून कुढत बसणे मला मान्य नव्हते. मी परिस्थितीचा स्वीकार केला आणि त्यावर मात करण्याचे ठरविले. यासाठी मला माझ्या कुटुंबियांनी आणि मित्र-मैत्रिणींनी बळ दिले. कुठल्याही गोष्टीला न घाबरण्याचे संस्कार माझ्यावर लहानपणीच झाले. प्रत्येकाकडून काही तरी नवीन शिकत राहण्याचा माझा छंद आहे.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, परीक्षा पद्धती तसेच शिक्षण पद्धतीला कायम दोष देत बसण्यापेक्षा स्वत:मधील उणिवांचा शोध घ्या, त्यावर मात करायला शिका आणि स्वत:च्या चुका शोधण्याची, त्या दुरुस्त करण्याची सवय लावा. कायम वास्तववादी राहण्याचा सल्लाही त्यांनी उपस्थिताना दिला. स्पर्धा परीक्षा आणि खास करून यूपीएससीची तयारी कशी करावी यासंबंधी इरा यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. आयपीएस हरेश्वर स्वामी व भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत यश मिळविणारे गौरव रॉय यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
सकाळी ११ वा. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात इरा सिंघाल विद्यार्थ्यांना भेटणार होत्या. परंतु प्रवासादरम्यान आलेल्या अडचणींमुळे त्या तब्बल ४ तास उशिरा आल्या. अशा परिस्थितीतही शेकडो विद्यार्थी त्यांचे प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी उन्हातान्हात बसून होते. त्या मंचावर येताच विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आणि विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन क रताना इरा म्हणाल्या की, स्वत:ला प्रश्न विचारायची सवय लावा. इतरांच्या तुलनेत आपण महान आहोत, असा विचार डोक्यात येताच स्वत:ची तुलना विश्वाशी करा, आपण कुठे आहोत लगेच लक्षात येईल. तसेच एकाच क्षेत्रात अडकून न राहता करिअरच्या अनेक नव्या संधी कायम शोधत राहा, असे आवाहनही त्यांनी केले.