कोयता मुक्तीसाठी ‘वृंदावना’त शिक्षणाचे धडे

By Admin | Published: July 11, 2017 12:11 AM2017-07-11T00:11:24+5:302017-07-11T00:12:57+5:30

बीड : समाजाचे आपण काही देणे लागतो, ही भावना जेव्हा आपल्यात जागृत होते तेव्हा निश्चितच आपली पावले आपोआप सत्कार्याकडे वळली जातात.

Learning lessons for Vrindavana | कोयता मुक्तीसाठी ‘वृंदावना’त शिक्षणाचे धडे

कोयता मुक्तीसाठी ‘वृंदावना’त शिक्षणाचे धडे

googlenewsNext

सतीश जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : समाजाचे आपण काही देणे लागतो, ही भावना जेव्हा आपल्यात जागृत होते तेव्हा निश्चितच आपली पावले आपोआप सत्कार्याकडे वळली जातात. जेव्हा ध्येय निश्चित असते, तेव्हा फलश्रुतीही हमखास प्राप्त होते मात्र त्यास अथक प्रयत्नाची जोड असावी लागते. पिंपळवाडीच्या निसर्गरम्य माथ्यावरील ‘वृंदावना’त बालगोपाळ हातातील कोयता सुटण्यासाठी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.
बीड जिल्हा हा तसा दुष्काळी भाग. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख. पिढ्यान पिढ्या हातात कोयता घेऊन जीवनाशी संघर्ष. पर्यायाने पुढची पिढी कधी शिकलीच नाही. कोयता घेऊन फडावर जायचे तर लहान लहान मुलांना कुठे ठेवायचे हा प्रश्न. जवळपास अख्खा गाव घराला कुलूप लावून ऊसतोडीसाठी भटकंती करत बाहेर. मुलांनाही सोबत घेऊन जाण्याशिवाय पर्याय नसायचा त्यामुळे मुले शिक्षणापासून वंचित. शिक्षण नसल्यामुळे पिढ्यान् पिढ्या कोयत्याने कधी हात सोडलाच नाही. हातातून कायमचा जर कोयता सोडायचा असेल तर या लहान मुलांना निवासासह शिक्षण उपलब्ध करून देण्याशिवाय पर्याय नाही, याच भावनेतून या पिंपळवाडीच्या डोंगरमाथ्यावर उपेक्षितांच्या मुलांसाठी ‘वृंदावन’ आधार ठरत आहे. गुरुकुल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पिंपळवाडीच्या माध्यमातून ‘वृंदावन’ या निवासी वसतिगृहात जवळपास पन्नासच्यावर लहान मुले शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. अगदी मोफत त्यांच्या निवास, भोजन आणि शिक्षणाची व्यवस्था होत आहे. मोफत व्यवस्था असल्यामुळे प्रवेशाचा ओघ वाढत आहे. आतापर्यंत आणखी जवळपास पन्नास जणांनी प्रवेश मिळावा म्हणून विनंती केली आहे. या वृंदावनात फक्त सध्या मुलांनाच प्रवेश आहे. वसतिगृहातील मुले पिंपळवाडीच्या खासगी आणि जि.प. शाळेत शालेय शिक्षणासाठी जातात.
ऊसतोड कामगार, उपेक्षित, शेतमजूरांच्या मुलांना या वृंदावनात प्रवेश दिला जातो. वृंदावनचे हे पहिलेच वर्ष असल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खूप काही करण्याची इच्छा असताना आर्थिक बाजू लंगडी पडत आहे. सामाजिक भावनेतून पिंपळवाडीचे माजी सरपंच युवराज बहिरवाळ, सरपंच अर्जुन बहिरवाळ, उपसरपंच शेख कटूभाई, संभाजी पाटील, मधुकर पाटील, सोमीनाथ धुमाळ, लक्ष्मण टाक, संजय भंडाणे, विठ्ठल बहिरवाळ यांनी पुढाकार घेऊन ज्ञानदानाचा वसा हाती घेतला आहे. जि.प. शाळेचे मुख्याध्यापक ए.डी. भांगे, केंद्र प्रमुख बी.एन. तांदळे, मुख्याध्यापक डी.ए. पाखरे, पी.ए.चौधरी, राजाभाऊ साळवे हे त्यांना सहकार्य करीत आहेत.

Web Title: Learning lessons for Vrindavana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.