वेळापत्रकानुसार बसेस सोडा
By Admin | Published: December 19, 2015 11:16 PM2015-12-19T23:16:56+5:302015-12-19T23:46:40+5:30
उस्मानाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद, तुळजापूर, भूम, लोहाऱ्यासह इतर आगारात ‘लोकमत’ने ७ डिसेंबर रोजी ‘स्टिंग आॅपरेशन’ करून बिघडलेल्या
उस्मानाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद, तुळजापूर, भूम, लोहाऱ्यासह इतर आगारात ‘लोकमत’ने ७ डिसेंबर रोजी ‘स्टिंग आॅपरेशन’ करून बिघडलेल्या वेळापत्रकाचे वृत्त प्रसिध्द केले होते़ या वृत्ताची दखल घेत विभाग नियंत्रक नवनीत भानप यांनी संबंधित आगारप्रमुखांना वेळेत बसेस सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत़ शिवाय जिल्ह्यातील आगारांचे नवीन वेळापत्रकही लवकरच तयार करण्यात येणार असून, पुढील काही दिवसातच नवीन वेळापत्रकानुसार बसेस धावणार आहेत़
जिल्ह्यातील विविध आगारातून शहरीच नव्हे तर ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या बसेस वेळेवर सुटत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या़ या अनुषंगाने ‘लोकमत’ने ‘स्टिंग आॅपरेशन’ केले होते़ यावेळी उस्मानाबाद स्थानकावर दुपारी १२ ते २ या कालावधीत अनेक बसेस या निर्धारित वेळेपेक्षा २० मिनिट ते १ तास उशिराने सुटल्याचे दिसून आले़ विशेषत: ग्रामीण भागातील बसेसच्या बाबतीत ही समस्या मोठी असल्याचे दिसले़ याशिवाय भूम, तुळजापूर व लोहारा येथील बसस्थानकातही अशीच परिस्थिती दिसून आली़
‘लोकमत’च्या या वृत्ताची दखल घेवून विभाग नियंत्रक नवनीत भानप यांनी जिल्ह्यातील सर्वच आगाराच्या प्रमुखांना शहरी, ग्रामीण भागातील बसेस वेळेवर सोडण्याबाबत सक्तीच्या सूचना दिल्या आहेत़ याशिवाय औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत नवीन वेळापत्रकाचे नियोजनही ठेवण्यात आले होते़ यात नागरिकांकडून आलेल्या नवीन बसेसची मागणी, उत्पन्न कमी देणारे मार्ग यासह इतर बाबींचा अभ्यास करून नवीन वेळापत्रक तयार करण्यात आले आहे़ या वेळापत्रकास मंजुरी मिळाल्यानंतर त्यानुसार बसेसच्या फेऱ्या वेळेतील होतील, यासाठीही प्रयत्न करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत़ (प्रतिनिधी)