लोकसभेची जागा शिवसेनेला सोडा! भूमरेंचा छत्रपती संभाजीनगरात अमित शाह यांच्याकडे आग्रह
By बापू सोळुंके | Published: March 5, 2024 06:58 PM2024-03-05T18:58:47+5:302024-03-05T18:58:59+5:30
पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाह यांची भेट घेतली.
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित जाहिर सभेसाठी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह हे मंगळवारी शहरात आले होते. या दाैऱ्यात राज्याचे रोहयोमंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाह यांची भेट घेतली. या भेटीत औरंगाबादलोकसभा सीट शिवसेनेचीच असल्याचे आणि ही जागा शिवसेनेस सोडा, असा आग्रह शाह यांच्याकडे धरल्याचे भुमरे यांनी पत्रकारांना सांगितले.
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादलोकसभा मतदार संघात निवडणूक लढविण्याची तयारी भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. हे सीट मिळविण्याच्या रणनितीचा भाग म्हणून पक्षाचे वरिष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज ५ मार्च रोजी शहरात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सभेमुळे महायुतीतील शिंदे गट शिवसेनेचे धाबे दणाणले आहे. आपल्या हक्काच्या औरंगाबाद लोकसभा सीट जाते काय, याची भिती पक्षाच्या नेत्यांना आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे राहेयो आणि फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना छत्रपती संभाजीनगर सीट शिवसेनेची आहे. यामुळे ही जागा शिवसेनेला सोडावे,अशी विनंती केल्याचे भुमरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.