निष्काळजीपणा सोडा; कोरोना वाढला पण सॅनिटायझरचा वापर मात्र घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 06:35 PM2021-03-18T18:35:08+5:302021-03-18T18:37:03+5:30
पोलीस व मनपाच्या कारवाईच्या धाकाने नागरिक मास्क वापरत आहेत. परंतु, हातावर लावण्यासाठी सॅनिटायझरचा वापर मात्र निम्म्याने कमी झाला आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दररोज हजारांचा आकडा पार करत आहे. यापासून धडा घेण्याऐवजी नागरिकांमध्ये दिवसेंदिवस निष्काळजीपणा वाढत आहे. मागील वर्षी सुरुवातीला सॅनिटायझरचा वापर वाढला होता. परंतु, मध्यंतरी रुग्णसंख्या कमी झाली आणि सॅनिटायझरचा खप निम्म्याने कमी झाला. आता रुग्णसंख्या वाढली तरीही सॅनिटायझर वापरण्याला लोक गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाची दुसरी लाट आल्याचे प्रशासन सांगत आहे. दररोज १ हजारांहून अधिक लोक कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत. दुसरीकडे दवाखान्यात रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत कोरोना होऊ नये, यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक बनले आहे. मात्र, परिस्थिती याउलट दिसत आहे. कोरोनाची लस आल्यानंतर नागरिक आणखी बिनधास्त झाले आहेत. पोलीस व मनपाच्या कारवाईच्या धाकाने नागरिक मास्क वापरत आहेत. परंतु, हातावर लावण्यासाठी सॅनिटायझरचा वापर मात्र निम्म्याने कमी झाला आहे. सॅनिटायझरच्या घाऊक विक्रेत्यानी सांगितले की, मागील वर्षी एप्रिल-मे दरम्यान ५ लीटरचे अडीच ते तीन हजार कॅन विकले जात होते. त्यानंतर औद्योगिक वसाहत सुरू झाली. त्यावेळी ७ हजार कॅनपर्यंत सॅनिटायझरची विक्री वाढली होती. डिसेंबरपासून पुन्हा विक्रीत घट सुरु झाली व ती दीड हजार कॅनवर येवून ठेपली. दुसऱ्या घाऊक विक्रेत्याने सांगितले की, शहरामध्ये महिन्याला १ लाख लीटर सॅनिटायझर विकले जात होते. मात्र, आता फेबुवारी महिन्यात ५० हजार लीटर सॅनिटायझर विकले गेले. एकिकडे कोरोना रुग्णाची संख्या वाढली तर दुसरीकडे सॅनिटायझर खरेदीदारांची संख्या मात्र घटली आहे.
निष्काळजीपणा वाढल्याचा परिणाम
नागरिकांमध्ये निष्काळजीपणा वाढल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात सॅनिटायझर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे; परंतु विक्री निम्म्याने घटली आहे. विशेष म्हणजे सॅनिटायझरची विक्री शहरात जास्त होत आहे. तुलनेने ग्रामीण भागात १० टक्केच सॅनिटायझरचा वापर केला जात आहे.
- नितीन दांडगे, सहसचिव, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन
वापर झाला कमी
सप्टेंबर महिन्यापर्यंत आम्हाला महिनाभरात एक ते दीड लीटर सॅनिटायझर लागत होते. मात्र, नंतर वापर कमी झाल्यामुळे आता महिनाभरात अर्धा लीटर सॅनिटायझर लागते.
- प्रसाद दहिवाल, ग्राहक
ग्राहक सॅनिटायझर नाही वापरत
आम्ही आमच्या मेडिकलमध्ये सॅनिटायझर ठेवले आहे. मागील वर्षी येणारा प्रत्येक ग्राहक सॅनिटायझर वापरत असे. मात्र, आता १५ ग्राहकांमधून एखादाच ग्राहक सॅनिटायझर घेतो. ग्राहकांना सॅनिटायझर दिले, तरी ते नको म्हणतात.
- बद्रीनाथ ठोबरे, औषध व्यावसायिक