नावाचे सोडा, दर्जेदार आरोग्य सेवांचे बोला! तीन वर्षांत दोनवेळा आरोग्य केंद्रांचे नामांतर
By विजय सरवदे | Published: January 11, 2024 05:22 PM2024-01-11T17:22:22+5:302024-01-11T17:22:48+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये अडीचशेहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची वानवा आहे.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये ग्रामीण नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा वाढविण्याऐवजी शासनाकडून या आरोग्य केंद्रांच्या नामांतरावरच भर दिला जात आहे. तीन वर्षांपूर्वी या आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रूपांतर करण्यात आले. त्यानंतर आता या आरोग्यवर्धिनी केंद्रांचे रूपांतर ‘आयुष्मान आरोग्य मंदिर’ असे केले जात आहे. दरम्यान, सातत्याने नावे बदलण्याऐवजी या केंद्रांद्वारे दर्जेदार आरोग्य सेवा द्याव्यात, अशी अपेक्षा ग्रामीण नागरिकांची आहे.
तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील सर्व ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रे व २२१ उपकेंद्रांची नावे ‘आरोग्यवर्धिनी केंद्र’ अशी करण्यात आली होती. त्यानंतर या केंद्रांना ना भौतिक सुविधा मिळाल्या, ना आरोग्य सेवा अद्यावत झाल्या. आता केंद्र शासनाच्या सूचनेनुसार नव्याने अस्तित्वात आलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रांची नावे बदलूून ती ‘आयुष्मान आरोग्य मंदिर’ या नावाने ओळखली जावीत. या केंद्रांच्या पाट्या बदलण्याची प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत राबविण्याच्या सूचना आरोग्य विभागाला मिळाल्या आहेत. त्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्राप्त निधीतून प्रति आरोग्य केंद्र ३ हजार रुपये याप्रमाणे खर्च केले जाणार आहेत. दरम्यान, रंगरंगोटी, प्रदर्शन व अन्य उपक्रमांसाठीचे कंत्राट संपुष्टात आल्यामुळे जि. प. आरोग्य विभागामार्फत नव्याने निविदा प्रक्रिया हाती घेतली आहे. आतापर्यंत ६० ते ७० आरोग्य केंद्रांच्या पाट्या बदलण्यात आल्या असून, जानेवारी अखेरपर्यंत एकूण २७२ आरोग्यवर्धिनी केंद्रांची नावे बदलण्यात येणार आहेत.
दरम्यान, नावे बदलण्यापेक्षा या आरोग्य केंद्रांमध्ये प्रसुतीचे प्रमाण व बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) रुग्णसेवेची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे ग्रामीण नागरिकांना वाटते.
आरोग्य कर्मचाऱ्यांची वानवा
प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये अडीचशेहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची वानवा आहे. मध्यंतरी जि. प. भरती प्रक्रियेत या पदांचा समावेश होता. परंतु, ही भरती प्रक्रियाच आता न्यायालयीन कचाट्यात अडकली आहे. त्यामुळे उपकेंद्रांची आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे.
आरोग्य केंद्रांतील सेवा
प्रसुतीपूर्व व प्रसुती सेवा, नवजात बालकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, बाल्य व किशोरवयीन आजार, लसीकरण सेवा, कुटुंब नियोजन, बाह्यरुग्ण सेवा, असंसर्गजन्य रोग नियोजन व तपासणी, नाक, कान, घसा व डोळे सामान्य आजारसंबंधी सेवा, दंत व मुखरोग आरोग्य सेवा, वाढत्या वयातील आजार, प्राथमिक उपचार व आपत्कालीन सेवा आदी.