जायकवाडीतून कोणत्याही क्षणी पाणी सोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 09:27 PM2017-09-18T21:27:33+5:302017-09-18T21:27:51+5:30
जायकवाडी ात ८७.६१ टक्के साठा झाला आहे. भारतीय हवामान खात्याने १७ ते २१ सप्टेंबरदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाठा व विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला असून तो खरा ठरल्यास जायकवाडीतून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येईल, असा इशारा सोमवारी जायकवाडी प्रशासनाने दिला आहे.
पैठण (जि. औरंगाबाद) : जायकवाडी ात ८७.६१ टक्के साठा झाला आहे. भारतीय हवामान खात्याने १७ ते २१ सप्टेंबरदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाठा व विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला असून तो खरा ठरल्यास जायकवाडीतून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येईल, असा इशारा सोमवारी जायकवाडी प्रशासनाने दिला आहे.
औरंगाबाद शहर व जायकवाडी परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने जायकवाडीच्या जलसाठ्यात गेल्या २४ तासात जवळपास एक टीएमसीने वाढ झाली आहे. सोमवारी दिवसभर धरणात १०४१३ क्युसेक क्षमतेने आवक सुरू होती. धरणाचा जलसाठा ८७.६१ टक्के एवढा झाला असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता फक्त सव्वादोन फूट बाकी आहे. यामुळे धरणात मोठ्या क्षमतेने आवक सुरू झाल्यास धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडावे लागणार आहे.
१५२२ फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडीची सोमवारी सायंकाळी पाणीपातळी १५१९.६८ फूट एवढी झाली होती.
धरणात एकूण जलसाठा २६४०.२११ दलघमी (९३.२२ टीएमसी) तर जिवंत जलसाठा १९०२.१०५ दलघमी (६७.१६ टीएमसी) एवढा झाला आहे. १ जून २०१७ पासून धरणात ६४.७३ टीएमसी पाण्याची आवक झाली असल्याचे धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.
नाशिक व नगर जिल्ह्यातून येणारी आवक बंद असली तरी स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पावसाने धरणातील जलसाठ्यात गेल्या १५ दिवसांपासून सातत्याने भर पडत आहे. भारतीय हवाामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस पडल्यास नाशिक व नगर जिल्ह्यातून धरणात मोठी आवक होण्याची शक्यता आहे. यामुळे जायकवाडी प्रशासन सतर्क झाले आहे. नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता बनसोड व धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी केले आहे.
तहसील प्रशासनाची बैठक
सोमवारी पैठणच्या तहसीलदारांनी आपत्ती व्यवस्थापनाची तातडीने बैठक घेतली; परंतु या बैठकीबाबत पत्रकार वा लोकप्रतिनिधी यांना कुठलीच कल्पना दिली नाही. त्यामुळे या बैठकीत काय ठरले, हे समजू शकले नाही.