सीना कोळेगावमधून भोत्रा बंधाऱ्यात पाणी सोडणार
By Admin | Published: May 16, 2017 12:02 AM2017-05-16T00:02:52+5:302017-05-16T00:06:06+5:30
उस्मानाबाद/परंडा : पीकांना उन्हाळी हंगामात सिंचन उपलब्ध व्हावे यासाठी सीना कोळेगाव प्रकल्पातून भोत्रा को. प. बंधाऱ्यात ३.५ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला
लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद/परंडा : पीकांना उन्हाळी हंगामात सिंचन उपलब्ध व्हावे यासाठी सीना कोळेगाव प्रकल्पातून भोत्रा को. प. बंधाऱ्यात ३.५ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचा निर्णय सोमवारी पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
पालकमंत्री श्री. रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत सिना कोळेगाव प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची सोमवारी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस बीड लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिक्षक अभियंता सुनंदा जगताप, भूमच्या उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे, उस्मानाबाद पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सु. म. जगताप, परंड्याचे उपविभागीय अभियंता प्रकाश देवकते, दीपक सरतापे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हे पाणी सोडताना थकबाकीदार परवानाधारकांकडून तातडीने थकबाकी वसुल करावी. सोडण्यात आलेल्या पाण्याचा लाभ फक्त परवानाधारक शेतकरीच घेतील यादृष्टीने कार्यवाही करावी. तसेच नदीपात्रात बेकायदेशीर वीजपंप लावून पाणीउपसा करणाऱ्यांवर कारवाई करावी अशा सुचनाही यावेळी पालकमंत्री रावते यांनी दिल्या. सीना कोळेगाव प्रकल्पात ११ मे २०१७ रोजी एकूण ७७.१२ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.
यापैकी उपयुक्त पाणीसाठा हा २.८२ दलघमी तर मृत पाणीसाठा हा ७४.३० दलघमी इतका आहे, अशी माहिती या बैठकीत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सिना कोळेगाव धरणातून भोत्रा को. प. बंधाऱ्यामध्ये उर्वरीत उन्हाळी हंगामासाठी ३.५० दलघमी पाणी सोडण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी यासाठी धरणातून भोत्रा बंधाऱ्यामध्ये ३.५० दलघमी पाणी सोडण्यास मान्यता देण्यात आली. पालकमंत्री रावते यावेळी म्हणाले की, हे पाणी सोडल्यानंतर पाणीचोरी होणार नाही यादृष्टीने कार्यवाही करण्यात यावी.