जायकवाडीतून पाणी सोडा, अन्यथा औरंगाबादचा पाणीपुरवठा बंद करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 02:22 PM2019-05-20T14:22:42+5:302019-05-20T14:25:17+5:30

पैठण ते चितेगाव या दरम्यान जलवाहिनीवर शेतकरी हल्ला करू शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave water from Jaikwadi dam, otherwise farmers from Paithan will stop water supply of Aurangabad | जायकवाडीतून पाणी सोडा, अन्यथा औरंगाबादचा पाणीपुरवठा बंद करु

जायकवाडीतून पाणी सोडा, अन्यथा औरंगाबादचा पाणीपुरवठा बंद करु

googlenewsNext
ठळक मुद्दे पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका शेतात उभ्या असलेल्या फळबागा आता माना टाकायला लागल्या आहेत.

पैठण (औरंगाबाद ) : पैठण तालुक्यातील आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यात जायकवाडी धरणातूनपाणी सोडले नाही तर २१ मे रोजी जायकवाडी धरणातून औरंगाबाद शहराला होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय रविवारी पैठण येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. बंधाऱ्यात पाणी सोडावे म्हणून पैठण तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.

पैठण तालुक्यातील आपेगाव व हिरडपुरी बंधारे कोरडे झाले आहेत. त्यातच पैठण ते हिरडपुरीदरम्यान गोदावरी पात्र आटले आहे. यामुळे गोदावरी पात्रातून ज्या गावांनी पाणीपुरवठा योजना केल्या आहेत, अशा गावात पाण्याचा ठणठणाट आहे. पैठण तालुक्यासह शेवगाव व गेवराई तालुक्यातील अनेक गावांना गोदावरी पात्र, आपेगाव व हिरडपुरी बंधारे आटल्याने भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गोदाकाठच्या गावात पाण्याच्या भरवशावर शेतात उभ्या असलेल्या अनेक वर्षांच्या फळबागा आता माना टाकायला लागल्या आहेत. वेळेत पाणी उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. पाण्यासाठी शेतकऱ्यांची तगमग वाढली असून यातून शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पाण्यासाठी अन्नदाता शेतकरी संघटना व शेतकरी संघटनेच्या वतीने १३ ते १६ मे या दरम्यान पैठण व औरंगाबाद येथे जोरदार आंदोलन केले होते; मात्र केवळ तोंडी आश्वासनावर प्रशासनाने शेतकऱ्यांची बोळवण केली होती. 
आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जोगेश्वरी येथे शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आम्हाला पाणी नाही तर कुणालाच नाही, अशी टोकाची भूमिका घेत औरंगाबाद शहराला होणारा पाणीपुरवठा तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस जयाजी सुर्यवंशी, हनुमान बेळगे, शरद गुंते, महादेव गोर्डे, वाघमोडे बाबा, शिवराज शिंदे, पवन औटे, सलीम पठाण, मकबूल पठाण, प्रशांत नरके, अशोक बनकर, दादासाहेब पवार, प्रदीप नरके, कृष्णा गहिरे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासन : आंदोलनातील सक्रिय चेहरे गायब
आजच्या बैठकीसाठी नेहमी आंदोलनात सक्रिय असलेले चेहरे दिसून आले नाही. प्रत्यक्षात पाणीपुरवठा तोडण्यासाठी हे चेहरे नियुक्त असून प्रशासनासमोर त्यांना आणण्यात आले नाही. पैठण ते चितेगाव या दरम्यान जलवाहिनीवर शेतकरी हल्ला करू शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Leave water from Jaikwadi dam, otherwise farmers from Paithan will stop water supply of Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.