निष्ठुर आई प्रियकरासोबत, तर वडील प्रेयसीसोबत पसार, तीन चिमुकल्या मुलींचे अश्रु थांबेनात
By सुमित डोळे | Published: February 29, 2024 11:16 AM2024-02-29T11:16:09+5:302024-02-29T11:18:36+5:30
अडीच महिन्यांपासून तीन चिमुकल्या मुली आई-बाबांची वाट पाहत रडताहेत...!
छत्रपती संभाजीनगर : घरात तीन लहान मुली असताना आई- वडील दोघांचे बाहेर वैयक्तिक विवाहबाह्य संबंध सुरू हाेते. मुलींचा कुठलाही विचार न करता एक दिवस दोघेही घर सोडून आपापल्या प्रियकर, प्रेयसीकडे चालले गेले. घरमालक, समाजसेवकांनी मुलींचा सांभाळ केला. गेले अडीच महिने आई- वडिलांच्या प्रतीक्षेत मुलींच्या डोळ्यातले अश्रू क्षणभरही थांबले नाहीत. मात्र, निष्ठुर आई- वडिलांना पोटच्या लेकरांविषयी पाझर फुटला नाही. अखेर, बाल कल्याण समितीला हा प्रकार कळाल्यानंतर सातारा पोलिस ठाण्यात आई- वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
सातारा परिसरात ही हृदयद्रावक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. राखी व संतोष (नावे बदललेली) हे जोडपे काही महिन्यांपासून सातारा परिसरात किरायाने राहत होते. त्यांना अनुक्रमे ११, ८ व ७ वर्षांच्या तीन मुली होत्या. सुरुवातीचे काही दिवस चांगले वाटलेल्या जोडप्याच्या वागण्यात काही दिवसांमध्येच बदल घडला. मुलींकडे त्यांचे दुर्लक्ष असायचे. अनेकदा नाहक मारहाण करायचे. डिसेंबर महिन्यात मायबाप बेपत्ता झाले. मुलींसाठी परत येतील, म्हणून घरमालकाने काही दिवस मुलींचा सांभाळ केला. मात्र, आजतागायत ते परतलेच नाहीत.
नातेवाइकांचाही शोध न लागल्याने स्थानिकांनी समाजसेवकांच्या मदतीने अंगणवाडी कार्यकर्त्या सविता सोनवणे यांना ही बाब कळवली. त्यांच्याकडून बालकल्याण समितीकडे हे प्रकरण गेले. अध्यक्ष ॲड. आशा शेरखाने कटके यांच्या आदेशाने छावणीच्या शासकीय बालगृहाच्या अधिकाऱ्यांनी मुलींना ताब्यात घेतले. बालगृह अधीक्षकांच्या तक्रारीवरून मुलींना घरी एकटेच सोडून गेल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे यांनी दिलेल्या माहितीनुसार आई जिल्ह्यातच एका पुरुषासोबत राहते, तर वडिलांचा शोध सुरू आहे.
...तर ७ वर्षांची शिक्षा
अशा प्रकरणात भादंवि कलम ३१७ (बारा वर्षांखालील मुलांना आई- वडिलांनी किंवा ज्यांच्याकडे देखभालीची जबाबदारी आहे. त्यांनी परित्याग करण्याच्या उद्देशाने उघड्यावर टाकणे) अंतर्गत गुन्हा दाखल होतो. यात ७ वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे.