डावा कालवा उघडला

By Admin | Published: May 19, 2014 01:29 AM2014-05-19T01:29:14+5:302014-05-19T01:33:55+5:30

औरंगाबाद : महापालिकेने सिडको-हडको पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकाची विस्कटलेली घडी बसविण्यास सुरुवात केलेली असताना जुन्या शहरात कमी दाबाने पाणी येत असल्याची ओरड सुरू झाली.

Left canal open | डावा कालवा उघडला

डावा कालवा उघडला

googlenewsNext

औरंगाबाद : महापालिकेने सिडको-हडको पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकाची विस्कटलेली घडी बसविण्यास सुरुवात केलेली असताना जुन्या शहरात कमी दाबाने पाणी येत असल्याची ओरड सुरू झाली. ती ओरड थांबविण्यासाठी मनपाने वेळापत्रकाचे पुन्हा मूल्यांकन करण्याची तयारी सुरू करताच जायकवाडीचा डावा कालवा १६ मेपासून उघडण्यात आला. त्यामुळे शहरात पाण्याची बोंबाबोंब सुरू झाली आहे. अनेक वसाहतींमध्ये ४ तास उशिरा पाणी येत आहे. ३१ मेपर्यंत कालवा सुरू राहणार असून, जूनमध्येदेखील कालव्यातून पाणी सोडावे लागणार आहे. जायकवाडीत सध्या ९.४२ म्हणजेच २०० द.ल.घ.मी. इतका जिवंत जलसाठा आहे. ३१ जुलैपर्यंत हा साठा पुरेल. जायकवाडीच्या अभियंत्यांनी कालवा उघडण्याची माहिती पालिकेला न देताच लपून-छपून कालवा उघडला. त्यामुळे ३०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला. अ‍ॅप्रोच चॅनलचे काम केलेले असतानाही पालिकेच्या उपशावर परिणाम झाल्याने दोन दिवसांपासून शहरात पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. दोन महिन्यांपासून शहरात पाणीपुरवठ्याची बोंबाबोंब सुरू आहे. त्यासाठी पालिका पाणीपुरवठा विभाग शर्तीचे प्रयत्न करीत आहे. मात्र, जलवाहिन्यांची गळती, कमी कर्मचारी आणि काही अधिकार्‍यांच्या मुजोरीमुळे हर्सूल आणि जायकवाडीत पाणी असतानाही नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. कोटला कॉलनी, क्रांतीचौक आणि शहाबाजार येथील जलकुंभावरील वसाहतींना कमी दाबाने पाणी येत आहे. सिडको-हडकोला साडेतीन एमएलडी पाणी वाढवून दिले आहे. ९ मेपासून फारोळा येथे पाण्याचा पुन्हा वापर करून साडेतीन एमएलडी पाणी सिडकोतील वसाहतींसाठी सोडण्यास सुरुवात झाली आहे. पाणीपुरवठा विभागाने वेळापत्रक सुरळीत केल्याचा दावा केला असला तरी विजेअभावी अनेक भागांत नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. जायकवाडीचे अभियंते म्हणतात... डावा कालवा १६ मेपासून सुरू आहे. एक आवर्तन द्यायचे होते. वरच्या धरणातून पाणी आले तर दुसरे आवर्तन लगेचच सोडण्यात येणार होते. मात्र, वरून पाणी आले नाही. ४मध्यंतरी पाऊस झाला. त्यामुळे दुसरे आवर्तन धरणातून देण्याची गरज पडली नाही. त्यानंतर कालव्यालगतच्या शेतकर्‍यांनी, लोकप्रतिनिधींनी पाणी सोडण्याची मागणी केली. प्रत्येक १० कि़ मी. वरील सी. आर. गेटजवळ कालवा अडवून शेती, विहिरी व पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून कालवा उघडण्यात आला आहे. २०८ कि़ मी. अंतराचा डावा कालवा आहे. ४२ ते ३ मीटरपर्यंत पाण्याची खोली निर्माण होण्यापर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे. तर काही तरी फायदा होईल, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. शासनाने पाणी सोडण्यास परवानगी दिल्यानंतर कालवा उघडण्यात आला. लपून-छपून कालवा उघडलेला नाही, असे जायकवाडीचे सहायक अभियंता के. एम. हिरे यांनी सांगितले. महापालिकेचे मत असे १६ मे रोजी रात्रीतून अचानक कालवा सुरू झाला. पालिकेला त्याची माहिती नव्हती. त्यामुळे पंपिंगवर परिणाम झाला. शहरावर त्याचा परिणाम झालेला नाही. पंपिंग स्टेशनवर यंत्रणा राबविल्यामुळे जास्त परिणाम झाला नाही. सध्या पाणीपुरवठा सुरळीत असल्याचा दावा उपअभियंता यू. जी. शिरसाठ यांनी केला. हर्सूलचे पाणी चालले कुठे हर्सूलच्या तलावात सध्या १६ फूट पाणी आहे. प्रभाग ‘अ’ व ‘क’ मधील सुमारे ३० वॉर्डांना हर्सूलचे पाणी पुरविले जात आहे. रोज १० एमएलडी पाणी तलावातून उपसले जात आहे. त्यामुळे जायकवाडीवरून ६९ वॉर्डांना पाणीपुरवठा होतो. हर्सूलमुळे मनपावरील खूप मोठा ताण हलका झालेला असताना शहरात पाणी कमी पडते का? असा सवाल पुढे येतो आहे. सिडको-हडकोला सध्या २६ एमएलडी पाणीपुरवठा होतो आहे. त्यामध्ये आणखी साडेतीन एमएलडी पाणीपुरवठा वाढविण्यासाठी फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याचा पुनर्वापर सुरू केला आहे. जायकवाडीतून येणार्‍या रॉ वॉटरमध्ये केमिकल टाकले जाते. त्यानंतर पाणी शुद्ध होते. या प्रक्रियेत बरेच पाणी वाहून जाते. ते पाणी पुन्हा प्रक्रियेत घेऊन शुद्ध करून वापरात घेतले जात आहे. त्यामुळे सिडको सध्या बर्‍यापैकी पाणीपुरवठा होतो आहे.

Web Title: Left canal open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.