लोककलेचा वारसा मुलांमध्ये नव्याने रुजविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 07:39 PM2019-05-28T19:39:32+5:302019-05-28T19:43:14+5:30

लोककलेचा वारसा नव्याने आजच्या बालकांमध्ये रुजविण्याचा स्तुत्य उपक्रम

The legacy of the folk art is an attempt to rejuvenate the children | लोककलेचा वारसा मुलांमध्ये नव्याने रुजविण्याचा प्रयत्न

लोककलेचा वारसा मुलांमध्ये नव्याने रुजविण्याचा प्रयत्न

googlenewsNext

- रुचिका पालोदकर

औरंगाबाद : आज इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांना ‘हिपहॉप’, ‘डिस्को’, ‘वेस्टर्न’ ही नावे जेवढी जवळची वाटू लागली आहेत तेवढीच ‘गण’, ‘गवळण’, ‘बतावणी’ यासारखी नावे त्यांचे चेहरे प्रश्नार्थक बनविणारी ठरत आहेत. मराठी संस्कृतीशी मुलांची तुटत जाणारी नाळ पकडून ठेवण्याचा आणि लोककलेचा वारसा नव्याने आजच्या बालकांमध्ये रुजविण्याचा स्तुत्य उपक्रम शाहीर विश्वासराव साळुंके स्मृती प्रतिष्ठान आणि गरवारे कम्युनिटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहेत. 

विश्वासराव साळुंके यांच्या पत्नी कमल साळुंके आज इतर कलावंत मंडळींच्या सहकार्याने हा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत. याविषयी सांगताना त्या म्हणाल्या की, लोकशाहीर विश्वासराव साळुंके यांचे २ जून १९९९ मध्ये अपघाती निधन झाले. त्यांच्या स्मृतींची ज्योत तेवत राहावी, यासाठी त्यांचे चाहते, मित्रमंडळी, कुटुुंबीय आणि कलावंतांनी पुढाकार घेऊन शाहीर विश्वासराव साळुंके स्मृती प्रतिष्ठानची स्थापना केली. प्रतिष्ठानअंतर्गत लोककलांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जायचे. नामवंत कलाकार येऊन कला सादर करायचे; पण यामुळे हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार नव्हता. त्यामुळे २००५ मध्ये अभिनेत्री शोभा दांडगे आणि डॉ. राजू सोनवणे यांच्या संक ल्पनेनुसार ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी उन्हाळी सुटीत १० दिवसीय मोफत लोककला प्रशिक्षण शिबीर घेण्याचा उपक्रम सुरू झाला.

मागील १४ वर्षांपासून या शिबिराचे नियमितपणे आयोजन करण्यात येत असून, यावर्षी दि. २२ एप्रिलपासून शिबिरास सुरुवात झाली. ३६ विद्यार्थी यांतर्गत नामवंत कलाकारांकडून प्रशिक्षण घेत आहेत. शिबिरात मुलांना गण, गवळण, बतावणी, लावणी, भारूड, गोंधळ, पोवाडा, लोकनृत्य, रंगभूषा, वेशभूषा, वासुदेव या लोककला शिकविल्या जातात. तसेच पारंपरिक वाद्यांची माहिती दिली जाते. अजिंक्य लिंगायत, समशेर पठाण, डॉ. हरी कोकरे, सुरेश जाधव, राजू सोनवणे, शाहीर रामदास धुमाळ, वासंती काळे, दिलीप खंडेराय यादरम्यान मुलांना प्रशिक्षण देत आहेत.
लोककलांची आवड वाढते आहे

पालक आणि मुलांचा शिबिराला मिळणारा प्रतिसाद पाहिला तर लोककला लोप पावत चालल्या आहेत, असे अजिबात वाटत नाही. उलट आपल्या पाल्यानेही लोककला शिकली पाहिजे, याबाबत अनेक पालक आग्रही दिसून येतात. आमच्यासाठीही लोककला शिबीर घ्या, अशी अनेक पालकांची मागणी आहे. येथे येणारे सर्व कलाकार मानधन न घेता विद्यार्थ्यांना मनापासून शिकवितात आणि हा लोककलांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. खरे तर लोककला शिकविण्यासाठी १० दिवसांचा कालावधीही अपुरा पडतो आहे. या शिबिरातून मुलांना आपली मराठी संस्कृती कळते. या उपक्रमासाठी गरवारे कम्युनिटी सेंटरतर्फेही मोलाचे सहकार्य मिळते.

Web Title: The legacy of the folk art is an attempt to rejuvenate the children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.