विधानपरिषद निवडणूक : मोबाईलमध्ये मतपत्रिकेचा फोटो काढणारा पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 18:39 IST2020-12-01T18:39:07+5:302020-12-01T18:39:45+5:30
सुलतानपुर मतदान केंद्रातील घटना

विधानपरिषद निवडणूक : मोबाईलमध्ये मतपत्रिकेचा फोटो काढणारा पोलिसांच्या ताब्यात
खुलताबाद : पदवीधरसाठीच्या मतदानावेळी मतपत्रिकेचा मोबाईलमध्ये फोटो काढल्याचा प्रकार खुलताबाद तालुक्यातील सुलतानपुर येथील केंद्रात उघडकीस आला. त्या मतदारास तात्काळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील सुलतानपुर येथे मतदान केंद्र आहे. दुपारी दोन वाजेच्या सुमारास अरूण वसंतराव खंडागळे ( रा. येसगाव नंबर तीन) हा मतदानासाठी केंद्रावर आला. मतदान करताना अरुणने सोबत नेलेल्या मोबाईलमध्ये मतपत्रिकेचा फोटो काढला. ही गोष्ट केंद्राध्यक्ष डी.एम.पाटील यांच्या लक्षात आली. त्यांनी ताबडतोब अरुणला पोलीसांच्या ताब्यात दिले. गोपनियतेचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सीताराम मेहत्रे यांनी गुन्हा दाखल केला आहे.