विधानसभेचे भान; नाराजांना मान !

By Admin | Published: September 14, 2014 11:46 PM2014-09-14T23:46:06+5:302014-09-14T23:47:11+5:30

बीड : अवघ्या महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत धोका होऊ नये, याची पूर्ण काळजी घेत रविवारी पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापतींच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.

Legislative assembly; Honor the angry! | विधानसभेचे भान; नाराजांना मान !

विधानसभेचे भान; नाराजांना मान !

googlenewsNext

बीड : अवघ्या महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत धोका होऊ नये, याची पूर्ण काळजी घेत रविवारी पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापतींच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. आगामी निवडणुकांचे भान राखत नाराजांना सभापतीपदाचा मान देण्यात आला. आरक्षणामुळे ‘कहीं खुशी कहीं गम’ असे चित्र पहावयास मिळाले.
जिल्ह्यात ११ पंचायत समित्या आहेत. आष्टी- पाटोदा पंचायत समित्यांत राज्यमंत्री सुरेश धस यांची हुकूमत आहे; परंतु आरक्षणामुळे सभापतीपदी माजी आमदार भीमराव धोंडे समर्थकांची वर्णी लागली आहे. धारुरात रमेश आडसकरांच्या बदलत्या राजकीय भूमिकेने राष्ट्रवादीच्या ताब्यातील पंचायत समिती भाजपाकडे आली. केज व वडवणीत चिठ्ठी काढून निवडी झाल्या. केजमध्ये भाजपा तर वडवणीत राष्ट्रवादीला लॉटरी लागली. निवडी जाहीर झाल्यावर कार्यकर्त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. फटाक्यांची आतषबाजी करुन मिरवणुका काढण्यात आल्या. (प्रतिनिधींकडून)
नवनियुक्त सभापती, उपसभापती
तालुकासभापतीउपसभापतीपक्ष
बीडउमाकांत जोगदंडअरुण लांडेराष्ट्रवादी
गेवराई आशा गव्हाणेअभिजित पंडितराष्ट्रवादी
आष्टीप्रियंका सावंतरंगनाथ धोंडेभाजपा
शिरुरमंडाबाई केदारजालींदर सानपभाजपा
परळी विद्यावती गडदेप्रा. बिभीषण फडभाजपा
वडवणी मीरा ढोलेपार्वती वाघमारेराष्ट्रवादी
धारुरअर्जुन तिडकेमंगल चोलेभाजपा
पाटोदाअनिल जायभायेप्रमिला सगळेभाजपा
केजअनिता मोराळेसरोजिणी ससाणेभाजपा
माजलगावअनिता थावरेकमल जाधवराष्ट्रवादी
अंबाजोगाईउषा किर्दतसविता लव्हारेभाजपा
पाटोद्यात अनिल जायभाये सभापती
या पंचायत समितीत सहा सदस्य आहेत. सभापतीपद ओबीसीसाठी राखीव होते. विशेष सभेत पाटोदा गणाचे सदस्य अनिल जायभाये यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली तर उपसभापतीपदी डोमरी गणाच्या प्रमिला सगळे यांची वर्णी लागली. जायभाये राष्ट्रवादीच्याच तिकिटावर पं. स. मध्ये निवडून गेलेले आहेत;पण माजी आ. भीमराव धोंडेंसोबत ते भाजपात दाखल झाले. निवडीनंतर जायभाये, सगळे यांचा सत्कार झाला. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. उपसभापतीपदी प्रमिला सगळे यांना संधी मिळाल्याने त्यांच्या धसपिंपळगाव येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पदाचा उपयोग सामान्यांच्या विकासासाठी करणार असून पक्षाचा विश्वास सार्थ ठरविणार असल्याचे सगळे म्हणाल्या.
धारुरात राकाँला ‘हाबाडा’
धारुर पंचायत समितीत सभापती, उपसभापती पदासाठी बोलावलेल्या सभेत प्रचंड राजकीय उलथापालथ झाली. सहा सदस्यांच्या या पंचायत समितीत भाजपा व राष्ट्रवादीचे समान सदस्य होते. मात्र, गतवेळी ड्रॉ काढला होता. त्यात राष्ट्रवादीने बाजी मारली होती. गेल्या आठवड्यात रमेश आडसकर यांनी राष्ट्रवादीशी काडीमोड घेतल्यानंतर त्यांच्यासोबत दोन सदस्य भाजपाच्या कळपात दाखल झाले. त्यामुळे भाजप सदस्यांची संख्या तीन वरुन पाचवर गेली. जयसिंह सोळंके हे एकमेव राष्ट्रवादीचे सदस्य उरले आहेत. सभापतीपद सर्वसाधारणसाठी सुटले होते. सभापतीपदासाठी भाजपाचे अर्जुन तिडके तर उपसभापतीपदाकरता मंगलबाई ज्ञानोबा चोले यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे त्या दोघांचीही बिनविरोध वर्णी लागली. भाजपा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. रमेश आडसकर, आर. टी. देशमुख, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, डॉ. स्वरुपसिंह हजारी, भारत पिंगळे, ऋषीकेश आडसकर, अशोक करे उपस्थित होते. भाजपाच्या सदस्या वंदना कोल्हे पंचायत समितीत आल्या;पण बैठकीला उपस्थित राहिल्या नाहीत. राष्ट्रवादीचे जयसिंह सोळंके यांनीही पाठ फिरवली.
माजलगावात निवडी बिनविरोध
येथील पंचायत समितीत १२ सदस्य आहेत. त्यापैकी १० सदस्य राष्ट्रवादीचे असून भाजपाचा एक अपक्ष एक आहे. सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित होते. आनंदगाव गणातील राष्ट्रवादीच्या अनिता विश्वांभर थावरे यांना सभापतीपदाचा मान मिळाला. त्या उपसभापती होत्या. आता त्यांना सभापतीपदी बढती देण्यात आली. उपसभापतीपदी भाजपाच्या कमल आत्माराम जाधव यांची वर्णी लागली. सभापती, उपसभापतीपदासाठी थावरे, जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडी जाहीर करण्यात आल्या. निवडीनंतर दोन्ही पक्षाच्या समर्थकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.
गेवराईत आशा गव्हाणे यांना संधी
गेवराई पंचायत समितीची सदस्य संख्या १६ असून आ. अमरसिंह पंडित यांचे वर्चस्व आहे. सभापतीपद सर्वसाधारणसाठी राखीव होते. हिरापूर गणाच्या सदस्या आशा आप्पासाहेब गव्हाणे यांची सभापतीपदी तर अभिजित पंडित यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. आशा गव्हाणे व अभिजित पंडित हे दोघेही स्वाभिमानी शेतकरी विकास आघाडीकडून निवडून गेले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सी. व्ही. सूर्यवंशी यांनी काम पाहिले. आ. अमरसिंह पंडित, जि.प. सदस्य विजयसिंह पंडित यांनी सभापती गव्हाणे, उपसभापती पंडित यांचा सत्कार केला.
परळीत गडदे सभापती
परळी पंचायत समितीत सर्वसाधारण महिलेसाठी सभापतीपद राखीव होते. या पंचायत समितीत भाजपाचे निर्निवाद वर्चस्व आहे. सभागृहात विशेष सभा पार पडली. यात सभापतीपदी मोहा गणातील सदस्या विद्यावती बळीराम गडदे तर उपसभापतीपदी धर्मापूरी गणातील सदस्य प्रा. बिभीषण फड यांची निवड करण्यात आली. सभापतीदासाठी सुवर्णा अंभारे यांचाही अर्ज आला होता;पण त्यांनी माघार घेतली. विद्यावती गडदे यांनी उपसभापतीदासाठीही अर्ज दाखल केला होता;पण त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सविता चौधर यांनी जबाबदारी पार पाडली.
आ. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सामान्यांची सेवा करु. पंचायत समितीचा कारभार पारदर्शक असेल. गोरगरिबांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे सभापती विद्यावती गडदे यांनी सांगितले. या निवडीबद्दल फुलचंद कराड यांच्यासह कार्यकर्त्यांनी सत्कार केला़ यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़
बीडमध्ये पुन्हा जोगदंड
बीड पं़ स़ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे़ विद्यमान सभापती काकासाहेब जोगदंड यांच्याकडेच पुन्हा सभापतीपद आले. उपसभापतीपदी अरुण लांडे यांची वर्णी लागली. विद्यमान उपसभापती संजय गव्हाणे यांच्यासह इतर नऊ सदस्यांना राष्ट्रवादीने व्हीप बजावला होता़ सभापतीपदासाठी सेनेकडून गणेश वरेकर, विलास महाराज शिंदे यांनी अर्ज केला होता़ मात्र शिंदे यांनी माघार घेतली़ जोगदंड यांना १० तर वरेकर यांना ६ मते पडली़ उपसभापती पदासाठी भाजपकडून श्रीकृष्ण मुंडे यांनी अर्ज दाखल केला होता़ जोगदंड, लांडे यांचा पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, डॉ. भारतभूषण क्षीरसागर, चेअरमन रवींद्र क्षीरसागर, जि.प. सभापती संदीप क्षीरसागर, गंगाधर घुमरे, अरुण डाके, बबन गवते, शाहेद पटेल, पवन तांदळे, सतीश शेळके, अ‍ॅड. इरफान बागवान, कुलदीप जाधव, भारत सोन्नर, परमेश्वर सातपूते यांनी स्वागत केले.
आष्टीत सावंत, धोंडे
आष्टी पंचायत समितीत सभापती पद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव होते. या प्रवर्गातील प्रियंका सावंत या एकमेव सदस्या असल्याने त्यांना सभापतीपदाचा मान अविरोध मिळाला. त्या कडा गणातून राष्ट्रवादीच्याच चिन्हावर पं़ स़ त निवडूून आल्या होत्या. मात्र, त्या माजी आ. भीमराव धोंडे गटाच्या मानल्या जातात. धोंडे आता भाजपात आहेत. उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीकडून रंगनाथ धोंडे तर भाजपाकडून अमोल चौधरी यांनी अर्ज भरला. धोंडे यांना आठ मते मिळाली तर चौधरींना पाच मतांवर समाधान मानावे लागले. प्रियंका सावंत यांनी तटस्थ राहणे पसंत केले. निवडीनंतर राज्यमंत्री धस यांच्या वतीने सत्कार झाला़
शिरुर पंचायत समितीच्या सभापतीपदी पुन्हा एकदा भाजपाच्या मंडाबाई केदार यांची वर्णी लागली तर उपसभापतीपदी शिवसेनेचे जालींदर सानप यांना संधी देण्यात आली. चार भाजपा, दोन शिवसेना व दोन राष्ट्रवादी अशी सदस्यसंख्या असलेल्या या पंचायत समितीत सभापतीपद मागासप्रवर्गासाठी राखीव होते.
केदार एकमेव सदस्या त्यासाठी पात्र होत्या. त्यामुळे त्यांची निवड निश्चित होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून लक्ष्मीकांत देशमुख यांनी काम पाहिले. यावेळी मंडाबाई केदार, जालींदर सानप यांचा सत्कार झाला. जि.प. सदस्य दशरथ वनवे, बाळासाहेब केदार, नवनाथ सानप, सुरेश उगलमुगले, प्रकाश खेडकर, गोकूळ सानप, नारायण परझणे, राजाभाऊ खेडकर, हरिमामा खेडकर, भरत जाधव उपस्थित होते.
वडवणी पंचायत समितीत राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली. भाजप व राष्ट्रवादीचे समान संख्याबळ असल्याने निवडीकडे सर्र्वांचे लक्ष वेधले होते.
चिठ्ठी काढून निवडी जाहीर झाल्या. यात राष्ट्रवादीच्या सदस्यांनी बाजी मारली. सभापतीपदी मीरा ढोले तर उपसभापतीपदी पार्वती वाघमारे यांची निवड झाली. भाजपाकडून सभापतीपदासाठी मच्छिंद्र झाटे व उपसभापतीपदाकरता सुलोचना आंधळे यांनी अर्ज भरला होता. निवडीबद्दल ढोले, झाटे यांचे आ. प्रकाश सोळंके, भारत जगताप, शेषेराव जगताप, संतोष डावकर यांनी स्वागत केले. कायकर्त्यांची मोठी उपस्थिती होती़
अंबाजोगाईत कीर्दत सभापती
अंबाजोगाई पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड रविवारी दुपारी पंचायत समितीच्या सभागृहात झाली. सभापतीपदी उषा जीवनराव किर्दंत तर उपसभापती पदी सविता दिनकर लव्हारे यांची बिनविरोध निवड झाली. भाजपाचे स्पष्ट बहुमत असल्याने या निवडी शांततेत पार पडल्या.
अंबाजोगाई पंचायत समितीत एकूण १२ गण आहेत. यापैकी भाजपा ९, राष्ट्रवादी काँग्रेस २ व मनसे १ असे बलाबल आहे. सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित होते. सभापती व उपसभापतीपदासाठी केवळ दोघींचेच उमेदवारी अर्ज आल्याने निवडणुका अविरोध झाल्या. बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाटील, भाजयुमो प्रदेश सरचिटणीस राजेश कराड, प्रताप आपेट, सुनील लोमटे, अविनाश लोमटे, प्रदीप गंगणे, शंकर नागरगोजे, हिंदुलाल काकडे यांनी स्वागत केले आहे़
दरम्यान, निवडीनंतर उषा कीर्दत, सविता लव्हारे यांचा सत्कार करण्यात आला़ त्यानंतर कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला़ यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़

Web Title: Legislative assembly; Honor the angry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.