विधानपरिषद निवडणूक : पहिल्या फेरीतील २० हजारांची मोजणी पूर्ण, राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 05:22 PM2020-12-03T17:22:44+5:302020-12-03T17:26:53+5:30
Marathwada Graduate Constituency Election मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी ३ लाख ७३ हजार १६६ पैकी २ लाख ४० हजार ७९६ मतदारांनी मंगळवारी मतदान केले आहे.
औरंगाबाद: पहिल्या फेरीतील ५६ हजारापैक्की २० हजार मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. यात महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी आघाडी घेतली आहे.
बीड जिल्ह्यातील मतमोजणी सध्या सुरु आहे. यात महाविकास आघाडीचे उमदेवार सतीश चव्हाण हे आघाडीवर आहेत. तसेच भाजपच्या शिरीष बोराळकर यांच्यासह बीडचे अपक्ष सिद्धेश्वर मुंडे, रमेश पोकळे यांनीसुद्धा मते घेत चुरस निर्माण केली आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी ३ लाख ७३ हजार १६६ पैकी २ लाख ४० हजार ७९६ मतदारांनी मंगळवारी मतदान केले आहे. दरम्यान, पोस्टलच्या एकूण १२४८ पैकी १७५ मते बाद झाली आहेत. १०७३ मतांची मोजणी सुरू आहे. यात राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी आघाडी घेतली आहे.
विजयाचा कोटा अद्याप निश्चित झाला नाही. ५६ टेबलवर मतमोजणी सुरु आहे. मतमोजणीच्या पाच फेऱ्या होणार असून त्यामध्ये वैध मतांची बेरीज करून पहिल्या पसंतीच्या मतानुसार विजयी होण्यासाठी कोटा ठरेल. वैध मतांच्या संख्येला दोनने भागून त्यात १ अधिक केल्यानंतर जी संख्या येईल, ती संख्या विजयासाठी कोटा म्हणून निश्चित करण्यात येईल. सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होताच सर्व मतपेट्यांमधील मतपत्रिका या एका दहा बाय दहाच्या मिक्सिंग ड्रममध्ये टाकण्यात आल्या आहेत. त्यानंतर दोन सभागृहांमध्ये प्रत्येकी २८ टेबलवर २५ मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे मोजणी करण्यात येईल. हे करीत असतानाच वैध मतपत्रिका काढण्यात येतील. त्यानंतर ३५ उमेदवारांच्या पसंतीनुसार मतपत्रिका पिजन बॉक्समध्ये वर्ग करण्यास सुरुवात होईल. येथूनच खरी मतमोजणी सुरू होईल. या सगळ्या प्रक्रियेला रात्री ८ वाजेपर्यंत वेळ लागेल. तोपर्यंत वैध मतांचा कोटा आणि विजयासाठी लागणाऱ्या एकूण मतदानाचा आकडा समोर येईल.