औरंगाबादच्या रहिवासी भागात बिबट्याचा थरार; एकावर हल्ला तर दोन कुत्र्यांचा पाडला फडशा
By साहेबराव हिवराळे | Published: September 11, 2022 07:57 PM2022-09-11T19:57:37+5:302022-09-11T19:58:01+5:30
बिबट्या नेमका कोठून आला, हे जाणून घेण्यासाठी त्याच्या पायाचे ठसे घेण्याचा प्रयत्न वन विभागाच्या पथकाने केला. पण, पावसामुळे ठसे मिळण्यास अडचणी येत आहेत.
औरंगाबाद: राजनगर मुकुंदवाडी परिसरात स्थानकालगत बिबट्याने शुक्रवारी रात्री दोन वाजता एका घरात झोपलेल्या व्यक्तीवर हल्ला केला. प्रतिकार केल्याने बिबट्या पळाला. जखमी व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत घाटीत पोहोचली. बिबट्याने धावून आलेल्या दोन कुत्र्यांचीही हत्या केली. या प्रकारामुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे.
मुकुंदवाडी रेल्वे स्थानकालगत राजनगरात शुक्रवारी पहाटे दोन वाजता संजय शेजवळ यांच्या घरामध्ये बिबट्याने घुसून हल्ला केला. उजव्या पायाचा पंजा पकडून बिबट्या ओढत असताना त्यांनी आरडाओरड केली. त्यांनी जोरदार प्रतिकार केल्याने बिबट्या तेथून निघून गेला. संजय शेजवळ यांनी जखमी अवस्थेत घाटी रुग्णालय गाठले. त्यांच्या पायात चार दात खोलवर घुसले असून, गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत.
बिबट्या शनिवारी पुन्हा याच भागात आला. त्यावर धावून गेलेल्या दोन कुत्र्यांना त्याने मारून टाकले. एक कुत्रे तेथेच मरून पडले, तर बिबट्याने दुसऱ्या कुत्र्याला आंधारात फरफटत नेले. या गोंधळामुळे परिसरातील तरुणांनी बिबट्याचा पाठलाग केला; परंतु तो सापडला नाही. अंधारात बिबट्या जंगलात गेला असावा किंवा अथवा पडक्या घरात दडून बसला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.
पायाचे ठसे घेण्याचा प्रयत्न
बिबट्या नेमका कोठून आला, हे जाणून घेण्यासाठी त्याच्या पायाचे ठसे घेण्याचा प्रयत्न वन विभागाच्या पथकाने केला. या भागात पावसामुळे चिखल झालेला आहे. त्यामुळे तेथे अन्य जनावरांचेही ठसे असल्याने बिबट्याच्या पायाचे ठसे मिळू शकले नाहीत. बिबट्याने दोन दिवसांत एक व्यक्ती आणि दोन कुत्र्यावर हल्ला केल्यामुळे वन विभागाच्या पथकाने मानवी वसाहतीमध्ये पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मोहन साळवे, शैलेश भालेराव यांनी केली आहे.
नागरी वसाहतीमध्ये दहशत
लोहमार्गालगत असलेले राजनगर ही गजबजलेली वसाहत आहे. तेथे बिबट्याने थेट घरात शिरून व्यक्तीवर हल्ला केल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. संजय शेजवळ यांनी जोरदार प्रतिकार केल्याने त्यांची कशीबशी सुटका झाली. पत्र्याच्या घरामध्ये रक्ताचा सडा पडला होता. बिबट्या पळून गेल्याचे चित्रीकरण परिसरातील ‘सीसीटीव्ही’मध्ये झाले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी दादाराव तौर यांनी अप्पासाहेब तागड यांचे पथक वन विभागाने पाठवले आहे.