अजिंठा लेणीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला बिबट्या; वन विभागाने केली जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 07:14 PM2021-06-21T19:14:31+5:302021-06-21T19:16:11+5:30
Leopard in Ajanta Caves : शनिवारी रात्री २ वाजेच्या सुमारास एक बिबट्या तिकीट बुकिंग ऑफिसजवळ असलेल्या मैदानात एका कुत्र्यावर हल्ला करण्यासाठी आला होता.
अजिंठा : अजिंठा लेणीच्या पायथ्याला असलेल्या तिकीट बुकिंग ऑफिससमोर शनिवारी मध्यरात्री एक बिबट्या कुत्र्यावर हल्ला करताना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. हे फुटेज व्हायरल झाल्याने लेणीत रात्रपाळी करणारे कर्मचारी व पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे कुणी एकटे दिवसा किंवा रात्री अजिंठा वनपरिक्षेत्रात व लेणीच्या डोंगरात फिरू नये असे आवाहन पुरातत्व विभागाचे अधीक्षक डी. एस. दानवे व अजिंठा वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. मांगदरे यांनी केले आहे.
अजिंठा लेणीत रात्री जवळपास १५ कर्मचारी लेणीची सुरक्षा करतात. हे कर्मचारी रात्री लेणीच्या ऑफिस व विविध ठिकाणी लेणीतील खोल्यांमध्ये काळजी घेऊन आश्रय घेतात. शनिवारी रात्री २ वाजेच्या सुमारास एक बिबट्या तिकीट बुकिंग ऑफिसजवळ असलेल्या मैदानात एका कुत्र्यावर हल्ला करण्यासाठी आला होता. मात्र, त्या कुत्र्याने धूम ठोकली. हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. तीन दिवसांपूर्वीसुद्धा एक बिबट्या पुरातत्व विभागाच्या जुन्या क्वॉर्टरजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. पर्यटकांनी घाबरू नये, फक्त डोंगरात वावरताना काळजी घ्यावी, असे आवाहन अधीक्षक डी. एस. दानवे यांनी केले आहे.
पिंजरा लावण्यास नकार
दरम्यान, अजिंठा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. मांगदरे यांनी लेणी परिसरात जाऊन तेथे वास्तव्यास असलेले कर्मचारी व पर्यटकांना काय सावधगिरी बाळगावी याबाबत जनजागृती केली. रात्री अपरात्री वन्यप्राणी आले तर काय काळजी घ्यावी याबाबत वनविभागाच्या वतीने लेणीत जनजागृती करण्यात आली. पुरातत्व विभागाचे अधीक्षक डी. एस. दानवे यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी पिंजरा लावण्यास नकार दिला आहे यामुळे आम्ही तेथे पिंजरा लावला नाही अशी माहिती मांगदरे यांनी दिली.
अजिंठा वनपरिक्षेत्रात ८ ते १० बिबटे
अजिंठा वनपरिक्षेत्रात जवळपास ८ ते १० बिबटे वास्तव्यास आहेत. मात्र, अजून कोणत्याही पर्यटकांवर त्यांनी हल्ला केलेला नाही. मात्र, पर्यटकांनी काळजी घ्यावी, डोंगरात एकटे जाऊ नये. बिबट्याने कुणावर हल्ला केला तर किंवा पुरातत्व विभागाने सांगितले तर आम्ही लेणीत पिंजरा लावून त्या बिबट्याला पकडून अभय अरण्यात सोडू.
- एस. पी. मांगदरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, अजिंठा