पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या पडला विहिरीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 08:51 PM2018-04-14T20:51:02+5:302018-04-14T20:52:56+5:30
सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे पाण्याच्या शोधात आलेल्या बिबट्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो विहिरीत पडल्याची घटना आज दुपारी घडली.
औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे पाण्याच्या शोधात आलेल्या बिबट्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो विहिरीत पडल्याची घटना आज दुपारी घडली. वन विभागाच्या पथकाने शिताफीने त्याला विहिरीबाहेर काढताच जखमी बिबट्याने वनक्षेत्रात धूम ठोकली.
अजिंठ्याच्या डोंगरपायथ्याशी वसलेल्या सोयगाव शिवारातील सर्वच पाणवठे महिनाभरापासून कोरडेठाक झाल्याने वन्यप्राण्यांच्या घशाला कोरड पडली आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांनी गाव शिवाराकडे धाव घेतली आहे. जरंडीच्या काटीखोरा शिवारातून पिण्याच्या पाण्यासाठी भ्रमंती करत आलेल्या बिबट्याला शेतकरी ज्ञानेश्वर तोताराम मोरे यांच्या शेतातील पाण्याने डबडबलेली विहिर दिसताच त्याने धाव घेतली. तोल गेल्याने बिबट्या विहिरीत पडला. यानंतर डरकाळ्या ऐकून शेतकरी ज्ञानेश्वर मोरे यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी परिसरातील शेतक-यांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी वनविभागाचे पथकास पाचारण करण्यात आले. ग्रामस्थांच्या मदतीने तीन तास संघर्ष करून बिबट्याला विहिरीबाहेर काढताच त्याने जखमी अवस्थेतच जंगलाकडे धूम ठोकली.
या कामी माजी उपसरपंच एकनाथ चौधरी, ग्रामपंचायत सदस्य मधुकर पाटील, भिवा चव्हाण, पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे, शेतकरी ज्ञानेश्वर मोरे, शांताराम पाटील, भगवान काकडे, ईश्वर मोरे, बाळूतात्या, वनपाल रावसाहेब दारुंटे, वनरक्षक माया जिने, गोविंदा गांगुर्डे, गणेश चौधरी आदींनी परिश्रम घेतले. वन कर्मचा-यांनी जीव धोक्यात घालून बिबट्याला बाहेर काढले. चारपायीवरून बाहेर येताच बिबट्याने भिवा चव्हाण, वनमजूर गणेश चौधरी यांच्यावर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला, परंतु या दोघांनी प्रसंगावधान राखल्याने अनर्थ टळला.