बिबट्या अधिवासात परतला, १७ जुलैपासून दर्शन नाही; अफवा पसरवणाऱ्यांवर होणार गुन्हे
By साहेबराव हिवराळे | Published: July 23, 2024 01:39 PM2024-07-23T13:39:00+5:302024-07-23T13:40:12+5:30
वन परिक्षेत्र अधिकारी-२, वनपाल व वनरक्षक २०, असे एकूण २२ अधिकारी व कर्मचारी यांच्या ४ टीम तयार करून शोधमोहीम सुरूच ठेवली जाणार
छत्रपती संभाजीनगर : शहरात बिबट्याचे पहिले दर्शन होऊन आठ दिवसांचा कालावधी लोटला. प्रोझोन एन-१ परिसरात बुधवारी (दि.१७) सीसीटीव्हीतील फुटेज शेवटचे होते. सोमवारी (दि.२२) बिबट्या कुठेही निदर्शनास आलेला नाही, तो त्याच्या अधिवासात गेला आहे. पण, तरीही दक्षता म्हणून आम्ही वेगवेगळ्या पथकांमार्फत गस्त कायम ठेवलेली आहे. यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे प्रादेशिक उपवन संरक्षक सूर्यकांत मंकावार यांनी सांगितले.
दरम्यान, बिबट्या किंवा त्या संबंधी काहीही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यास त्याविरोधात आम्ही गुन्हा दाखल करू, असेही मंकावार यांनी स्पष्ट केले. यामुळे आता नागरिकांनी सतर्क राहावे, अफवा, चुकीचे व्हिडीओ व्हायरल होत असतील तरीही वन विभागास कळवावे. सोमवारी (दि.२२ जुलै) उल्कानगरी, प्रोझोन मॉल, एस.टी. डेपोची जमीन, एम.आय.डी.सी. परिसर, एन-०१ परिसर, नारेगाव परिसर, रेल्वेस्टेशन परिसर, मराठवाडा केमिकल कंपनी, गादिया विहार, प्रतापनगर स्मशानभूमी परिसर, पोद्दार शाळा परिसर, देवानगरी परिसर, उच्च न्यायालय परिसर, सिडको परिसरात गस्त घातली. तसेच सीसीटीव्ही फुटेज व ट्रॅप कॅमेरे तपासण्यात आले. यात बिबट्या आढळून आला नाही. या सर्व परिसरात जनजागृती करण्यात आली.
शनिवारी लावलेले सर्व ट्रॅप कॅमेरे रविवारी चेक करण्यात आले. ट्रॅप कॅमेऱ्यातही बिबट्या वन्यप्राणी आढळून आला नाही. तसेच वन परिक्षेत्र अधिकारी-३, वनपाल वनरक्षक २२, असे एकूण २५ अधिकारी व कर्मचारी यांच्या १० तुकड्या तयार करून शहराच्या वरीलप्रमाणे सर्व भागात दिवसभर गस्त करून शोधमोहीम आठ दिवस सुरू होती. सोमवार (१५ जुलै) ते सोमवार (दि.२२) चार पथकांद्वारे गस्त घालण्यात आली. या आठही दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले परंतु, बिबट्या किंवा इतर वन्यप्राणी आढळून आला नाही.
शोधमोहीम सुरूच राहणार ...
सोमवार (दि.२२) सकाळी ८ वाजेपासून वन परिक्षेत्र अधिकारी-२, वनपाल व वनरक्षक २०, असे एकूण २२ अधिकारी व कर्मचारी यांच्या ४ टीम तयार करून शोधमोहीम सुरूच ठेवली जाणार आहे. तसेच एकूण १० ट्रॅप कॅमेरेही विविध ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. नागरिकांनी घाबरू नये, काहीही असल्यास नागरिकांनी १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असेही आवाहन मंकावार यांनी केले आहे.