सुलीभंजन परिसरात बिबट्याचे पर्यटकांना जवळून दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 09:21 PM2021-08-19T21:21:01+5:302021-08-19T22:12:02+5:30
Leopard in Sulibhanjan : काही पर्यटकांना रस्त्यावर फिरताना बिबट्या दिसून आला
औरंगाबाद : सुलीभंजनवरून दत्त मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर बिबट्याने (leopard ) काहीवेळ दर्शन देऊन तो घनदाट झाडीत निघून गेला. पर्यटकांनी गुरुवारी सकाळी १०.३० वाजता हे क्षण मोबाइलमध्ये कैद केले. बिबट्या रस्ता पार करीत असताना पर्यटकांनी वाहने थांबविली होती. (Tourist seen Leopard in Sulibhanjan )
बिबट्याची अन्नसाखळी जुळली आहे. डोंगरावरील वनक्षेत्रात त्याचे वास्तव्य असून, शिकारीचा पाठलाग करीत तो रस्त्यावर आला असावा. त्यावेळी तो पर्यटकांच्या नजरेस पडला. काहीकाळ थांबून तो जंगलात निघून गेला. अचानक समोर बिबट्या पाहून पर्यटकांचे श्वासही गळ्यातच अडकला होता. काहींनी हिंमत करून हे क्षण मोबाइलमध्ये कैद करून व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याने सुलीभंजन परिसरातील वनरक्षक प्रशांत निकाळजे, आय्युब शाह नारायण जंगले, रहेमान शाह, वाल्मिक गवळे, बाबू भाई, काळे मामा, माजेद अली यांचे पथक शोधमोहिमेसाठी रवाना झाले.
सायंकाळपर्यंत शोधमोहीम...
बिबट्याचा या परिसरात अधिवास असून, तो स्वत:हून कुणावरही हल्ला करीत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट वनक्षेत्र असून तो तो चुकून रस्त्यावर आला असावा. मानसाची चाहूल लागल्याने तो पसार झाला. पावसाळी वातावरण असल्याने पर्यटकांची दिवसभर गर्दी होते. खबरदारी घेत वनविभाग तसेच ग्रामस्थांनी सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबविली. नागरिकांनीही त्याची छेड काढू नये दिसल्यास वनविभागाला कळवावे. असे वनरक्षक प्रशांत निकाळजे यांनी सांगितले.
दर्शनासाठी कुटुंबासह सहलीवर...
मारुती जंगले हे कुटुंबासह दर्शनासाठी गेले होते. सुलीभंजनकडून दत्तधाम मंदिराकडे येत असतांना सकाळी १०.३० वाजता बिबट्या रस्त्यावर जाताना दिसला. त्याला पाहून इतरही वाहने थबकली होती. असे नारायण जंगले यांनी सांगितले.
दिवसभर चर्चा...
१५ दिवसांपूर्वीच वेरूळच्या घाटात व लेणी परिसरात बिबट्या दिसून आल्याने वनविभागाने त्याचा माग काढला होता, परंतु तो आढळला नाही. गुरुवारी सकाळी बिबट्या सुलीभंजन दत्तधाम मंदिर रोडवर दिसून आल्याने दिवसभर याचीच सोशल मीडियावर चर्चा सुरू होती.