छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्याचे दर्शन; पहाटे उल्कानगरीत फिरताना सीसीटीव्हीत कैद
By साहेबराव हिवराळे | Published: July 16, 2024 01:45 PM2024-07-16T13:45:20+5:302024-07-16T14:00:28+5:30
बिबट्या पहाटे ३:४७ वाजता गल्लीत फिरताना सीसीटीव्हीत कैद झाल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा वन विभागही खडबडून जागा झाला.
छत्रपती संभाजीनगर : उल्कानगरीत वीजपुरवठा खंडित झाल्याने ती कशामुळे गेली हे शोधण्यासाठी लाईनमन दुचाकीवर फिरत असताना दुचाकीच्या हेडलॅम्पच्या उजेडात बिबट्याचे दर्शन झाल्याने तो घाबरला. त्याने अख्खी उल्कानगरी जागी केली. वन विभागाच्या पथकाने दिवसभर नाला, पडके घर, झाडेझुडपे शोधली; पण पथक रिकाम्या हाताने परतले. दिवसभर समाज माध्यमावर बिबट्या दिसल्याच्या जुन्या क्लिपिंगही फिरल्या. उलटसुलट चर्चाही सुरू होत्या. अखेर बिबट्या पहाटे ३:४७ वाजता गल्लीत फिरताना सीसीटीव्हीत कैद झाल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा वन विभागही खडबडून जागा झाला.
दुरुस्तीसाठी आलेल्या वायरमनने पहाटे उठवताच नागरिक खडबडून जागे झाले. आपापल्या घराची दारे, खिडक्या व्यवस्थित बंद आहेत का ते पाहू लागले. तेव्हाच सोशल मीडियावर वृत्त पसरले. उल्कानगरीतून नाला वाहत असून, बहुतांश ठिकाणी तो भूमिगत आहे. त्या ठिकाणी झाडेझुडपे खूप वाढली आहेत. लगतच्या गल्लीतून पूर्वेस गेल्यानंतर उभ्या गल्लीत तो दिसल्याचा दावा दत्ता ढगे या लाईनमनने केला आहे. वन विभागाने सर्वत्र पाहणी केली, माहिती घेतली, परंतु काहीही बिबटा दिसला नाही. गजबजलेल्या वसाहतीत तो आला कसा, असाही प्रश्न माजी नगरसेविका स्मिता घोगरे, दिलीप थोरात, सागर नीळकंठ, विकास कुलकर्णी, श्याम लहाने, आशा जाधव, आदींनी उपस्थित केला. परंतु, जेव्हा श्याम लहाने यांनी सीसीटीव्ही फुटेज बघितले असता बिबट्याचे दर्शन झाले. भिंतीवरून तो नाल्याकडे दाट झाडाझुडपाकडे जाताना दिसतो.
टोल फ्री १९२६ नंबरवर कळवा...
परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता कोणतेही संशयित चित्र निदर्शनात आले नव्हते. सोशल मीडियावर व्हायरल फोटो हा जुनाच असल्याचेही दिसले. परिसरात कुठेही त्याचा माग सापडलेला नाही. घाबरू नये. बिबट्या दिसल्यास १९२६ या टोल फ्री नंबरवर कळवा.
- दादासाहेब तौर, वन परिक्षेत्र अधिकारी