अजिंठ्यातील बिबट्याचे दर्शन औरंगाबादमधील म्हणून सोशल मीडियात व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 07:39 PM2020-07-15T19:39:03+5:302020-07-15T19:54:19+5:30
सोशल मीडियावर व्हायरल बिबट्याचे दर्शन देवळाई-सातारा डोंगरावरील नाही
औरंगाबाद : दोन दिवसांपासून बिबट्याचे देवळाईच्या डोंगरावर दर्शन झाल्याचा खोटा संदेश फिरत होता आणि वनविभागाला सत्य शोधताना मोठी दमछाक झाली. ते फोटो अजिंठा रेंजमधील मूकपाठ येथील शेतकऱ्यांनी शनिवारी सायंकाळच्या दरम्यान काढल्याचे उघड झाले.
सातारा-देवळाईच्या वनक्षेत्रातील डोंगरावर बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांचे वास्तव्य असून, जंगलात कुणी जाऊ नये असे सूचना फलकही लावलेले आहेत; परंतु सोशल मीडियावरील संदेशाने वनविभागाची दिवसभर दमछाक झाली, तर सातारा- देवळाईतील नागरिकही सतर्क झाले. दुपारनंतर या फोटोचा उलगडा झाला. त्यामुळे नागरिकांचा जीव भांड्यात पडला.
पाऊलवाटेवर आढळल्या पाऊलखुणा
मंगळवारी वनक्षेत्रालगतच्या माळरानावरील पाऊलवाटेवर बिबट्याच्या पाऊलखुणा काही शेतकऱ्यांना आढळून आल्या. त्यामुळे शेतकरी घाबरले आहेत.
वनक्षेत्रात जाण्यास प्रतिबंध
शेतकऱ्यांनी व कोणीही वनक्षेत्रात जाऊ नये वनविभागाचे कर्मचारी त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. वनविभागाच्या परवानगीशिवाय कुणी फिरताना आढळल्यास वन कायदा १९७२ प्रमाणे गुन्हे दाखल करून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी शशिकांत तांबे व पथकाने सांगितले.