नागरी वसाहतीत शिरलेला बिबट्या आठ तासाच्या थरारानंतर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 05:02 PM2019-12-03T17:02:49+5:302019-12-03T17:05:11+5:30
वन विभागाच्या रेस्क्यू टीमला यश
औरंगाबादः शहरातील सिडको एन-1 भागातील काळा गणपती मंदिर परिसरातील नागरी वसाहतीत शिरलेल्या बिबट्याला तब्बल ८ तासाच्या थरारनंतर वन विभागाच्या पथकाने जेरबंद केले. यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
मंगळवारी सकाळी ६. ३० वाजेच्या दरम्यान सिडको एन-१ भागातील शामा प्रसाद मुखर्जी उद्यानात मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. येथे काहीवेळ थांबल्यानंतर बिबट्याने बाजूच्या हनुमान मंदिराच्या आवारात उडी घेतली. यानंतर बिबट्याला नागरिकांची चाहूल लागल्याने तो तेथील नागरी वसाहतीमध्ये दडून बसला होता. प्रत्यक्षदर्शीनी लागलीच ही माहिती वन विभागाच्या अधिकार्यांना दिली.
यानंतर वन विभागाचे एक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यासोबतच पोलिसांचा फौजफाटा व मनपाचे काही अधिकारीही तेथे हजर झाले. बघ्यांची गर्दी वाढल्यामुळे बिथरलेला बिबट्या एका घरात लपून बसला होता. वन विभागाच्या पथकाने रेस्क्यू ऑपरेशन राबवत गुंगीच्या औषधाचा बंदुकीच्या सहाय्याने मारा बिबट्यावर केला. यामुळे बिबट्या बिथरून एका पडक्या घरात जाऊन दडून बसला. अखेर दुपारी २ ते २.३० वाजेच्या दरम्यान बिबट्याला जेरबंद करण्यात आले.