बिबट्यांचा जन्म होतो येथे फक्त मरणासाठीच ! वनविभागाकडे आधुनिक साधनांचा अभाव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 07:29 PM2022-06-20T19:29:16+5:302022-06-20T19:29:46+5:30
मराठवाड्यासाठी दौलताबाद येथे वन नर्सरीत दवाखाना झाल्यास जखमी प्राण्याचे जीव वाचविणे सोपे होईल
- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : दौलताबाद येथे जखमी प्राण्यावर उपचार करण्यासाठी व त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी दवाखाना प्रस्तावित आहे; परंतु ते अद्याप उभारण्यात आलेले नसल्याने जखमी प्राण्यांना ठेवायचे कसे? बिबटे येथे फक्त मरणासाठीच जन्म घेतात की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. कारण औरंगाबाद-जालना परिसरात अलीकडच्या काळात विविध घटनांत ११ बिबट्यांसह बछड्यांनाही जीव गमवावा लागला.
नागपूर येथे असा सोयी-सुविधानुरूप वनविभागाचा दवाखाना असून, तेथे वन्यजीव विभागाचा वैद्यकीय स्टाफ आणि रेस्क्यू टीम दिमतीला आहे. त्याच धर्तीवर मराठवाड्यासाठी असा दवाखाना दौलताबाद येथे वन नर्सरीत झाल्यास जखमी प्राण्याचे जीव वाचविणे सोपे होईल, असे वन्यजीवप्रेमी तसेच अभ्यासकांचे मत आहे.
बिबट्यांचे मृत्यू थांबवा..?
जखमी प्राण्यांवर उपचारासाठीचा दवाखाना राज्य शासनाने वनविभागाला देऊ केलेला आहे; परंतु तो अद्यापही येथे उभारण्यात आलेला नाही. जखमी प्राण्यावर उपचार तसेच विविध परवानगी, अशा सोपस्कारामुळे वेळ वाया जातो. त्यात जखमी बिबट्याला मृत्यूला सामोरे जावे लागते. हे किती दिवस चालणार?
- डॉ. किशोर पाठक (मानद वन्यजीव रक्षक, औरंगाबाद)
त्रुटी लवकरच वरिष्ठांच्या प्रयत्नांनी भरून निघणार...
जखमी प्राण्यांना वाचविण्यासाठी रेस्क्यू पथकाकडून प्रयत्न केले जातात. अत्याधुनिक दवाखाना, उपचार साधनांचा अभाव असला तरी विभागातर्फे प्रयत्न कमी पडत नाहीत; परंतु या त्रुटी लवकरच वरिष्ठांच्या प्रयत्नाने भरून निघतील.
- अरुण पाटील (सहायक वनसंरक्षक, औरंगाबाद)