रावेर शिवारात बिबट्याचा मुक्तसंचार; प्रसंगावधान राखून झाडावर चढल्याने शेतकरी बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 06:36 PM2020-04-16T18:36:14+5:302020-04-16T18:36:47+5:30
वन्य प्राण्यांच्या कोणताही अधिवास आढळून आल्यास शेतकऱ्यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सोयगाव : शेतातच चरण्यासाठी सोडलेल्या शेळ्या पाहून ज्वारीच्या शेतात लपलेला बिबट्याने अचानक हल्ला केला. मात्र यावेळी बिबट्याला रानडुक्कर समजून शेळ्यांची सुटका करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला झाडावर चढून जीव वाचवावा लागल्याची घटना गुरुवारी दुपारी तालुक्यातील रावेरी शिवारात गुरुवारी दुपारी घडली.
रावेरी(ता.सोयगाव)शिवारात शेतकरी कैलास राजाराम मोरे हे ज्वारीच्या पिकांची राखण करत असताना शेळ्यांना चरण्यासाठी सोडले होते.अचानक ज्वारीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. यावेळी बांधावर उभ्या असलेल्या मोरेंना रानडुक्कर असल्याचा भास झाला आणि ते पुढे गेले. मात्र चवताळलेल्या बिबट्याने डरकाळी फोडताच शेतकऱ्याने प्रसंगावधान राखून जवळच्या बांधावर असलेल्या झाडावर चढत आपला जीव वाचवला.
दरम्यान, बिबट्याने एका शेळीची शिकार करून दुसरीस गंभीर जखमी केले. यावेळी मोरे यांनी झाडावरून मदतीसाठी आरडाओरडा केल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व बिबट्याला लाठ्याकाठ्यांच्या सहाय्याने हुसकावून लावले. यानंतर मोरे यांना शेतकऱ्यांनी खाली उतरवले. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक भिका पाटील,वनमजूर गोविंदा गांगुर्डे, अमृत राठोड आदींनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा करून बिबट्याचे ठसे घेतले आहे.पाणी पिण्याच्या हेतूने जंगलातील हा बिबट्या शेतात आला असावा असा अंदाज वनविभागाने वर्तविला असून शेती शिवारात शेतकऱ्यांनी एकटे फिरू नये,तसेच गटागटाने शेतात काम करावे,असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांनी केले आहे. वन्य प्राण्यांच्या कोणताही अधिवास आढळून आल्यास शेतकऱ्यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.