शिक्षणाच्या पटावरही मुलींची संख्या मुलांपेक्षा कमी !
By Admin | Published: January 2, 2017 11:55 PM2017-01-02T23:55:03+5:302017-01-02T23:57:00+5:30
लातूर कायद्याचा धाक आणि मुली जन्माच्या स्वागताची जनजागृती झाली असली, तरी जन्मदराचा टक्का सुधारण्याचे नाव घेत नाही.
आशपाक पठाण लातूर
कायद्याचा धाक आणि मुली जन्माच्या स्वागताची जनजागृती झाली असली, तरी जन्मदराचा टक्का सुधारण्याचे नाव घेत नाही. परिणामी, पहिली ते बारावीच्या हजेरीपटावरही मुलींपेक्षा मुलांची संख्या सर्वाधिक आहे. मुलांचा पट ६९ टक्क्यांचा असून, मुलींचा पट केवळ ३१ टक्के आहे. नर्सरीत ‘ए, बी, सी, डी’ मुलांना ओळख करुन देणाऱ्या रणरागिणी असल्या तरी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या ज्ञानदानात पुरुष शिक्षकांचीच संख्या जास्त आहे. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त घेतलेला हा आढावा.
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘लेक वाचवा,’ आदी माध्यमातून मुलींच्या जन्माचा टक्का वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करीत असले, तरी अजूनही शिक्षण, नोकरी आदी क्षेत्रांत महिलांचा टक्का कमीच आहे. लातूर जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ५ लाख ६९ हजार ५६६ एवढी आहे. शैक्षणिक वर्ष २०१५-१६ च्या या विद्यार्थी संख्येत मुलींचे प्रमाण २ लाख ५६ हजार ३९५ आहे, तर मुलांची संख्या ३ लाख १३ हजार १७१ एवढी आहे. पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक असते. त्यानंतर मात्र विविध कारणांमुळे शिक्षण सोडणाऱ्या मुलींची संख्या आजही लक्षणीय आहे. उच्च शिक्षणात मुलींचा टक्का अल्पच आहे.
मुलींना शिक्षणाचा अधिकार देत पहिली शाळा सुरू करून ज्ञानदानाचे काम करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून मार्गक्रमण करणाऱ्या सावित्रीच्या लेकींची विविध क्षेत्रातील पिछेहाट हा चिंतनाचा विषय आहे. पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे धडे देणाऱ्या शिक्षकांमध्ये महिला शिक्षिकेचे प्रमाण केवळ २१ टक्के आहे. १९ हजार ९२५ शिक्षकांमध्ये स्त्रियांची संख्या ५ हजार २८३ इतकी आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या महिला शिक्षिकांची संख्या कमी असली, तरी मुलांमध्ये बालवयात शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचे कार्य नर्सरीत (अंगणवाडी, बालवाडी) केले जाते. या ठिकाणी मात्र ९५ टक्क्यांहून अधिक महिला ज्ञानदानाचे काम करीत आहेत. एकूणच मुलांवर मुख्य संस्काराचा भाग असलेल्या बालवयात स्त्रियाच शिक्षणाची बीजे रोवत असल्याचे दिसत आहे.