विद्यापीठातील २८ विभागांत दोन आकड्यांपेक्षा कमी प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 12:15 AM2018-07-02T00:15:18+5:302018-07-02T00:16:12+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थी संख्येचे विदारक वास्तव समोर आले आहे. विद्यापीठ आणि उपकेंद्रातील तब्बल २८ विभागांमध्ये १० पेक्षा कमी प्रवेश झाले आहेत.
राम शिनगारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थी संख्येचे विदारक वास्तव समोर आले आहे. विद्यापीठ आणि उपकेंद्रातील तब्बल २८ विभागांमध्ये १० पेक्षा कमी प्रवेश झाले आहेत. यातील चार विभागांत, तर एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नाही. आठ विभागांत १५ पेक्षा कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. एकाही विभागात १०० टक्के प्रवेश पूर्ण झालेला नाही.
विद्यापीठात मागील वर्षीपासून सामाईक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) माध्यमातून प्रवेश देण्यात येतो. मागील वर्षी प्रवेश प्रक्रियेचे तीनतेरा वाजल्यामुळे यावर्षी परीक्षेच्या नियोजनात अचूकपणा आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या अल्प प्रतिसादामुळे अनेक वेळा नोंदणी, प्रवेश फेऱ्यांना मुदतवाढ द्यावी लागली. तिसºया प्रवेश फेरीनंतर ३ हजार ९९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, तर ५ हजार ८३७ जागा रिक्त राहिल्या. त्यातही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाऐवजी महाविद्यालयांना प्राधान्य दिले आहे. विद्यापीठ आणि उपकेंद्रातील एकूण ५२ पदव्युत्तर अभ्यासक्रमांतील तब्बल २८ विभागांमध्ये दहापेक्षा कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. याचवेळी यातील चार विभागांत भोपळा आणि इतर चार विभागांत केवळ १ प्रवेश झाला. आठ विभागांत १५ पेक्षा कमी प्रवेश झाले आहेत.
मराठीसह भाषा विषयाकडे विद्यार्थ्यांची पाठ
विद्यापीठातील विविध भाषा विषयाच्या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. यात रशियन भाषा व साहित्याला ००, तर मराठी विभागात अवघ्या ५ (७०) (कंसातील आकडेवारी ही एकूण जागांची आहे) विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. हिंदीमध्ये ७ (७०), पाली आणि बुद्धिझम ७ (७०), संस्कृत १ (७०) आणि उर्दू ५ (७०) विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. याचवेळी विद्यापीठातील इंग्रजी भाषेत ३५ (७०) आणि उपकेंद्रातील इंग्रजी विभागात अवघा १ (७०) प्रवेश झाला आहे.
या विभागांना मिळाला चांगला प्रतिसाद
विद्यापीठातील वाणिज्य ५४ (७०), रसायशास्त्र ६९ (७०), अर्थशास्त्र ४५ (७०), राज्यशास्त्र ३१ (७०), विधि ३८ (७०), पत्रकारिता २५ (४०), बायोकेमिस्ट्री १६ (२२), वनस्पतीशास्त्र ४२ (४८), संगणशास्त्र २८ (३२), गणित ६६ (७०), भौतिकशास्त्र ४६ (४८), संख्याशास्त्र २४ (३२), प्राणिशास्त्र ५६ (७०), अॅनॅलिटल केमिस्ट्री २० (२४), सोशल वर्कमध्ये २६ (४०).
पारंपरिक, व्यावसायिक
अभ्यासक्रमांना अल्प प्रतिसाद
विद्यापीठात शिकविल्या जाणाºया पारंपरिक, व्यावसायिक अभ्यासक्रमांनाही अल्प प्रतिसाद मिळाला आहे. यात पार्ट टाईम एमबीए ६ (६०), पर्यटनशास्त्र ६ (३०), भूगोल १५ (७०), इतिहास १४ (७०), मानसशास्त्र १४ (७०), लोकप्रशासन ६ (७०), समाजशास्त्र १३ (७०), स्त्री अभ्यास ७ (७०), योगा ७ (७०), पुरातत्वशास्त्र १ (२९), संगीत ९ (७०), महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर विचारधारा १ (७०), ग्रंथालयशास्त्र ३ (२२), परफॉर्मिंग आर्ट ५ (३०), फाईन आर्ट ५ (२५), माहिती तंत्रज्ञान १४ (३२), पर्यावरणशास्त्र ७ (३२), नॅनोटेक्नॉलॉजी ४ (२०), इलेक्ट्रॉनिक्स सायन्स ६ (४०), आॅटोमोबाईल एमव्होक ३ (५०), इंडस्ट्रियल आॅटोमेशन ४ (५०), तर फाईन आर्ट रिसर्च ११ (२५) विद्यार्थ्यांचा समावेश आहे. उस्मानाबाद उपकेंद्रातील जल आणि भूमिव्यवस्थापन विभागात ३ (४०), बायोटेक्नॉलॉजी १५ (२६) आणि मायक्रोबायलॉजी १४ (२६).