चिखल, दगड, लिंबोळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना धडे..!
By Admin | Published: February 27, 2017 12:22 AM2017-02-27T00:22:51+5:302017-02-27T00:24:55+5:30
उमरगा : चिखल, दगड, लिंबोळी, गजगे, बिया, गोट्या आदी सहज उपलब्ध होणाऱ्या घटकांचा शैक्षणिक साहित्य म्हणून वापरण्याची संकल्पना शिक्षिका उषा गाडे-इंगळे यांनी यशस्वी केली आहे़
उमरगा : चिखल, दगड, लिंबोळी, गजगे, बिया, गोट्या आदी सहज उपलब्ध होणाऱ्या घटकांचा शैक्षणिक साहित्य म्हणून वापरण्याची संकल्पना तालुक्यातील जवळगाबेट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहशिक्षिका उषा गाडे-इंगळे यांनी यशस्वी केली आहे़ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसह शाळेतील उपस्थितीही शंभर टक्के झाली आहे़
चिखलात खेळायला लहान मुलांना आवडते. तसेच दगड, गोट्या, लिंबोळी, गजगे, चिंचोके यांच्यासोबत खेळायलाही त्यांना वेगळाच आनंद मिळतो़ नेमकी ही गोष्ट हेरून उषा गाडे - इंगळे यांनी वरील साहित्याचा शैक्षणिक साहित्य म्हणून उपयोग करण्याचा संकल्प केला़ चिखलातून चौकोन, आयत, त्रिकोण, वर्तुळ, अपूर्णांक आणि वेगवेगळे आकार या संकल्पना तिसरी - चौथीचे विद्यार्थी शिकले. छोटे-छोटे दगड, गोट्या, गजगे, बिया, लिंबोळी, चिंचोके यांचा वापर करून बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया विद्यार्थी सहजपणे करीत आहेत़ ज्ञानरचनावादावर आधारित प्रत्यक्ष अनुभव शिक्षण देण्याचे काम या उपक्रमातून साध्य झाले़ विशेष म्हणजे या शैक्षणिक साहित्याला कसलाही खर्च आला नाही. भरमसाठ पैसे खर्चून तयार केलेले रंगीबेरंगी शैक्षणिक साहित्य अनेकदा विद्यार्थ्यांना भावत नाही. मात्र, ज्या वस्तूंसोबत विद्यार्थी दररोज खेळतात, ज्या वस्तू नेहमी विद्यार्थ्यांच्या खिशात असतात त्याच वस्तूंपासून विद्यार्थ्यांना शिकायला आवडते व ते आनंदाने शिकतात, हे या उपक्रमातून समोर आले आहे़
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्याचा शैक्षणिक साहित्य म्हणून वापर सुरू केल्यापासून विद्यार्थी गणिती क्रिया वेगाने करू लागले आहेत़ यामुळे विद्यार्थ्यांच्या गणिती संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत़ वर्ग शंभर टक्के प्रगत झाला असून, विद्यार्थी पूर्णवेळ शाळेत थांबत असल्याचे उषा गाडे यांनी सांगितले़ (वार्ताहर)