"देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो"; कोरोना तपासणी, निर्बधांचे अडथळे पार करून वारकऱ्यांनी घेतले नाथांचे दर्शन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 05:51 PM2021-04-02T17:51:06+5:302021-04-02T17:58:52+5:30

Nathshashti Paithan तहसीलदार दत्तात्रय निलावाड, पोलीस निरीक्षक  किशोर पवार,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, आदी अधिकारी यात्रा मैदानात तळ ठोकून होते. 

"Let the body go or stay, Pandurangi firm feeling"; Warkaris crossed Corona inspection, the barriers and took Nath's darshan | "देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो"; कोरोना तपासणी, निर्बधांचे अडथळे पार करून वारकऱ्यांनी घेतले नाथांचे दर्शन  

"देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो"; कोरोना तपासणी, निर्बधांचे अडथळे पार करून वारकऱ्यांनी घेतले नाथांचे दर्शन  

googlenewsNext
ठळक मुद्देनगर परिषदेच्यावतीने केंद्रात झाली कोरोना तपासणी करण्यात आली.दिर परिसर व दिंडी मार्गाचे निर्जंतुकिकरण करण्यात आले. नाथ मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते.

- संजय जाधव

पैठण : 

देह जावो अथवा राहो । 
पांडुरंगी दृढ भावो ।।
चरण न सोडी सर्वथा ।
आण तुझी पंढरीनाथा ।।

कोरोनाची धास्ती बाजुला सारून पैठणनगरीत नाथषष्ठीच्या वारीसाठी आलेल्या वारकऱ्यामुळे संत नामदेवांच्या या अभंगाची प्रचीती आज पैठण नगरीला आली. प्रशासनाने टाकलेले कडक निर्बंध, कोरोनाची तपासणी, रणरणते ऊन अशा अनेक परीक्षा देत शेकडो वारकऱ्यांनी बंद असलेल्या नाथ मंदिराच्या बाहेरून नाथांचे दर्शन घेत नाथषष्ठी वारी खंडीत होऊ दिली नाही.

नाथ महाराजांच्या दर्शनाच्या ओढीने  पैठण शहरात आलेल्या वारकऱ्यांना आज बंद दरवाज्याच्या बाहेरून नाथांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर अलौकिक असे समाधान प्राप्त झाले. कोरोनाच्या संकटाला न जुमानता प्रशासनाच्या नियमाचे पालन करीत नाथषष्ठी साठी दाखल झालेल्या वारकऱ्यांच्या  उत्साहाने पैठण नगरीस वारकरी संप्रदायाच्या आगाढ श्रध्देची प्रचिती आली. मुखातून भानुदास एकनाथाचा जयघोष व समोरासमोर भेट होताच एकमेकांचा होणारा चरण स्पर्श या वारकरी संप्रदायाच्या महान परंपरेचे चित्र आज ही दिसून आले.

नाथषष्ठीच्या निमित्त आज दिवसभर पैठण शहरात अधुनमधून वारकऱ्याच्या छोट्या  दिंड्या दाखल होत होत्या. हातात भगवा ध्वज, गळ्यात तुळशीमाळ,  महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, मुखात भानुदास एकनाथाचा जयघोष , हाताने टाळ मृदंगाचा गजर करित शहराच्या रस्त्यावरून दिंड्या मंदिराकडे जात असताना आज मात्र नेहमीसारखी गर्दी नव्हती. शहरात  दाखल झालेल्या दिंड्यांचे पैठणकरांना आज मोठे कौतुक वाटले.

विजयी पांडुरंगास अभिषेक -
आज षष्ठी असल्याने पहाटे गावातील नाथ मंदिरात असलेल्या विजयी पांडुरंगास पंचामृत स्नान व अभिषेक नाथवंशजांच्या वतीने घालून  विधिवत पूजा करून पून्हा स्थानापन्न करण्यात आले. त्याच वेळी बाहेरील नाथ मंदिरातील संत एकनाथ महाराजांच्या समाधिची सुध्दा विधिवत पूजा करण्यात आली.  

नाथ वंशजाची मानाची दिंडी....
दुपारच्या समयी गावातील नाथ मंदिरातून नाथ वंशज व मानकऱ्याची मानाची  निर्याण  दिंडी  पारंपरिक अभंग म्हणून काढण्यात आली या दिंडीच्या अग्रभागी सजवलेला रूबाबदार अश्व, त्या नंतर जरी पटका,  भानुदास महाराजांचे निशाण, झेंडेकरी  त्यानंतर दिंडी विणेकरी,  आदी सहभागी झाले होते.  मानाची ही दिंडी गावातील नाथमंदिरातून निघून कावळे गल्ली, उदासी महाराज मठ  मार्गे गोदावरीच्या वाळवंटातून  पश्चिम भागातील गोदावरी द्वारातून बाहेरील नाथ मंदिरात नेण्यात आली. या ठिकाणी, 

अवघेची त्रैलोक्य आनंदचि आता ।
चरणी जगन्नाथा चित्त ठेले ।|
माय जगन्नाथ बाप जगन्नाथ । 
अनाथांचा नाथ जनार्दन ।। 
एका जनार्दनी एक पणी ऊभा । 
चैतन्याची शोभा शोभतसे ।।

हा अभंग घेण्यात आला. जलसमाधी घेण्या अगोदर  हाच अभंग घेत नाथमहाराजांनी  शेवटचे किर्तन केले होते, म्हणून हा अभंग परंपरेने घेण्यात आला. यानंतर भानुदास एकनाथाच्या गजरात पूर्वद्वाराने दिंडी बाहेर पडली व परत गावातील नाथ मंदिरात नेण्यात आली. तेथे महाद्वारास भानूदास महाराजांचे निशाण लावून आरतीने सांगता करण्यात आली .

परंपरेने नुसार दिंडीचे स्वागत....
नाथवंशजांच्या दिंडीचे परंपरेनुसार आज वाळवंटात नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी स्वागत केले दरवर्षी लाखोच्या संख्येने उपस्थित असलेले वारकरी  दिंडीच्या दर्शनासाठी वाळवंटात हजेरी लावतात. गर्दीत लोटालोट होते.  यंदा मात्र वारकरीच उपस्थित नसल्याने  निर्याण दिंडीत मोजकेच वारकरी भाविक उपस्थित होते.निर्याणदिंडी साठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

वारकऱ्यांच्या सेवेत खंड....
नाथषष्ठी निमित लाखो वारकरी पैठण शहरात तीन दिवस मुक्कामी असतात. या वारकऱ्यांना आपले पाहुणे आहेत अशा पध्दतीने पैठणकर धाऊन जात मदत करतात. वारकऱ्यांना पाणी, नाष्टा, जेवन, चहा, फराळ, आदीबाबत आपआपल्या परिने सेवा देण्याचा प्रयत्न पैठणकरांचा नियमितपणे असतो. अनेक वर्षांपासून परंपरा सुरू असल्याने वारकरी व पैठणकर यांच्यात अध्यात्मिक ऋणानुबंध तयार झाले आहेत. यंदा मात्र कोरोनामुळे पैठण शहरात मुक्कामी राहण्यास वारकऱ्यांना प्रशासनाने मनाई केल्याने वारकऱ्यांना पैठण शहरात थांबता आले नाही. यामुळे यंदाच्या षष्ठीला  वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली नसल्याची खंत पैठणकरांना बोचते आहे. 

अधिकारी यात्रा मैदानात...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाथषष्ठी निमित्त पैठण शहरात दाखल झालेल्या वारकऱ्यांची तपासणी, व आरोग्य सेवा देण्याचे मोठे आव्हान प्रशासना समोर होते. यात्रेत तहसीलदार दत्तात्रय निलावाड, पोलीस निरीक्षक  किशोर पवार,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, आदी अधिकारी यात्रा मैदानात तळ ठोकून होते. 

मठ, मंदीरे रिकामे....
नाथषष्ठीच्या दिवशी पैठण शहरातील सर्व मठ मंदिर, मंगल कार्यालये वठारकऱ्यांच्या उपस्थितीने खचाखच भरलेली असतात. या मठा मंदिरातून वारकरी महाराज किर्तन प्रवचन, भजन करतात. यामुळे हरिनामाच्या गजराने पैठण नगरी दुमदुमून जाते. यंदा मात्र मठ व मंदिरात वारकरी नसल्याने मठ मंदिरे शांत शांत होती.

वारकऱ्यांची तपासणी....
शहरात येणाऱ्या वारकरी व भाविकांची आज नगर परिषदेच्यावतीने उभारण्यात आलेल्या केंद्रात तपासणी करण्यात आली. मंदिर परिसर व दिंडी मार्गाचे निर्जंतुकिकरण करण्यात आले. नाथ मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. यात्रे दरम्यान नगर परिषद प्रशासनाच्यावतीने सुरू असलेल्या उपाय योजनाचा आढावा नगराध्यक्ष सुरज लोळगे व मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी यात्रा मैदानातील कार्यालयातून घेतला. यावेळी शहरातील प्रत्येक भागात जंतुनाशक व रोग प्रतिबंधात्मक औषध फवारणी यंत्रणा वाढवून शहरातील प्रत्येक भागात फवारणी करण्याचे आदेश नगराध्यक्ष लोळगे यांनी दिले. यावेळी स्वच्छता निरीक्षक भगवान कुलकर्णी, व्यंकटी पापुलवार, अशोक पगारे खलील धांडे आदी उपस्थित होते.

Web Title: "Let the body go or stay, Pandurangi firm feeling"; Warkaris crossed Corona inspection, the barriers and took Nath's darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.