जो जे वांछील, ते तो खावो! गरिबांचे अन्न आता श्रीमंतांचे झाल्याने ते महाग बनले: शाहू पाटोळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 16:30 IST2025-02-17T16:27:47+5:302025-02-17T16:30:44+5:30
आपल्या खाद्य संस्कृतीची लाज वाटणे, यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाही. ज्यांना जे खायचे, ते खाऊ द्या

जो जे वांछील, ते तो खावो! गरिबांचे अन्न आता श्रीमंतांचे झाल्याने ते महाग बनले: शाहू पाटोळे
छत्रपती संभाजीनगर : ज्वारी, बाजरी, नाचणी, राळे ही तृणधान्ये (मिलेट्स) गरिबांच्या ताटात असत. या तृणधान्यांतील पोषक तत्त्वांचे महत्त्व समजू लागल्याने हॉटेलच्या मेनूमध्ये आता मिलेट्स डिश दिसतात. गरिबांचे हे अन्न आता श्रीमंतांचे झाल्याने ते महाग बनल्याचे प्रतिपादन लेखक शाहू पाटोळे यांनी केले.
वाळूज येथील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात मराठवाडा साहित्य परिषदेच्या ४४ व्या साहित्य संमेलनातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मंचावर लेखक शाहू पाटोळे यांची मुलाखत अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी आणि भूषण कोरगावकर यांनी घेतली. पाटोळे म्हणाले की, पूर्वी ग्रामीण भागात बाराही महिने सर्वांच्या जेवणात रानभाज्या असत. अनेक भाज्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात. करडईचे तेल घरोघरी वापरले जाई. मात्र, आता करडई तेलाचे महत्त्व कळाल्याने या तेलाचे दर चढे असतात. शेतातील तण काढण्यासाठी तणनाशकाचा वापर केला जात असल्याने रानभाज्या दुर्मीळ होत आहेत. आता जो तो चुलीवरचे जेवण पसंत करत आहे. जेव्हा चपला नव्हत्या, तेव्हा पायी जात. आता लोक विनाचपलांचे फिरताना आपण पाहतो. १९७२ च्या दुष्काळाला इष्टापत्ती असल्याचे बोलले जाते. ते कसे, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, दुष्काळात इंदिरा गांधी यांनी माणसे जगविली. तेव्हाच पाम तेल स्वयंपाक घरात आले. प्रथम अस्पृश्य लोक विस्थापित झाले.
जो जे वांछील, ते तो खावो....
गोहत्या कायद्याचे रूपांतर आता गोवंश हत्येत झाले. याचा परिणाम मुस्लिमांवर होतो, या दृष्टिकोनातून काही लोक पाहतात. परंतु, तसे नाही. कारण हे खाद्य काही केवळ एकाच समूहाचे नाही. असे असते तर खाटकांकडे हिंदू कॅलेंडर नसते. आपल्या खाद्य संस्कृतीची लाज वाटणे, यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाही. ज्यांना जे खायचे, ते खाऊ द्या, असेही पाटोळे यांनी नमूद केले.