तुला पास व्हायचयं, आम्हाला खूष कर !
By Admin | Published: December 19, 2015 11:28 PM2015-12-19T23:28:18+5:302015-12-19T23:54:52+5:30
प्रताप नलावडे , बीड तू मला खूष कर, मी तुला बारावीच्या परीक्षेत पास करतो, असे सांगत माझ्याबरोबर लैंगिक संबंध ठेवले आणि त्यानंतर मला ब्लॅकमेलिंगच्या प्रकरणात
प्रताप नलावडे , बीड
तू मला खूष कर, मी तुला बारावीच्या परीक्षेत पास करतो, असे सांगत माझ्याबरोबर लैंगिक संबंध ठेवले आणि त्यानंतर मला ब्लॅकमेलिंगच्या प्रकरणात अडकविले असल्याचा गौप्यस्फोट शनिवारी संध्याकाळी बुलडाण्याच्या तरुणीने केला. दोन प्राचार्य आणि एका प्राध्यापकाने आपल्यासारख्या अनेक अडचणीत सापडलेल्या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केले असल्याचा दावाही तिने केला. यासंदर्भात आपण या तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करणार आहोत, असेही ती म्हणाली. गेली चार दिवसांपासून ‘लोकमत’ने शैक्षणिक क्षेत्रातील सेक्स रॅकेटचा विषय चव्हाट्यावर आणल्यावर या मुलीने आज विद्यार्थिनींचे शोषण होत असल्याची कबुली दिली. त्यामुळे जिल्ह्याचे संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रच हादरून गेले.
शनिवारी सायंकाळी सहा वाजता ब्लॅकमेलिंग प्रकरणात अडकलेल्या त्या तरुणीची जामीनावर मुक्तता झाली. त्यानंतर लोकमतने तिच्याशी संपर्क साधला. यावेळी तिने या ब्लॅकमेलिंग प्रकरणाचा पर्दाफाशच केला.
तिचे आणि त्या प्राध्यापकाचे संबंध कसे आले, यासंदर्भात माहिती देताना ती तरुणी म्हणाली, बारावीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे निराश होऊन मी बुलडाणाहून औरंगाबादला आले होते. यावेळी लक्ष्मी नावाच्या मुलीशी माझी ओळख झाली. तिने बीड जिल्ह्यातील एका प्राचार्याशी माझे फोनवरून बोलणे करून दिले. त्या प्राचार्याने मी तुला माझ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन देतो. तुला पास करतो, असे म्हणत तू मला खूष कर, असे म्हटले. त्यानंतर बारावी पास होऊन पोलिसात भरती होण्याचे स्वप्न असल्याने मी त्यांच्या अमिषाला बळी पडले. गेल्या दोन महिन्यात दहा ते पंधरावेळा माझ्याशी त्या प्राचार्याने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर त्या प्राचार्याचा आते भाऊ असलेला एक प्राध्यापक औरंगाबादला आला आणि त्यानेही माझ्याशी बळजबरीने संबंध ठेवले. या दोघांनंतर आणखी एका प्राचार्याने आपल्याला फोनवरून मला पण खूष कर, मी तुला पाहिजे ते देतो, असे म्हटले. यानंतर त्याने आपल्याला वारंवार फोन केले. परंतु हे सगळेच माझे शोषण करत असल्याचा प्रकार माझ्या लक्षात आला. प्राचार्य व प्राध्यापकांनी परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कुकर्म केल्याचे तिने सांगितले.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
ते दोन प्राचार्य आणि एका प्राध्यापकाविरूध्द तरुणीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती रात्री उशिरा खुद्द पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी दिली. त्या तरुणीने व तिच्या वकिल अॅड. संगीता धसे यांनी नऊ वाजण्याच्या दरम्यान पारस्कर यांची भेट घेतल्यानंतर गुन्हा नोंद करण्याचे आदेश देण्यात आले. शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून त्यानंतर तो औरंगाबाद पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे पारसकर यांनी सांगितले.
भवितव्य अंधारात
बुलडाणा येथील तरुणीला बारावी पास व्हायचे होते. मात्र, ती प्राचार्य, प्राध्यापकांची शिकार बनल्याचे समोर आले. शोषणाबरोबरच तिच्यावर ब्लॅकमेलिंगसारखा गंभीर आरोपही झाला. त्यामुळे आता तिचे शिक्षण व तिच्या पुढील भविष्याचे काय ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
मला महिनाभरापूर्वी आपण प्रेग्नंट आहोत की काय, अशी शंका आल्याने त्या प्राचार्याला आपण ही माहिती दिली. त्याने मला काही औषधेही दिली. परंतु त्यानंतरही मी प्रेग्नंट असल्याची जाणीव मला झाल्याने मी मला यातून सोडवा, अशी विनवणी केली.
४यानंतरही तो प्राचार्य टाळाटाळ करू लागल्यानंतर मी स्वत:च माझ्या सेफ्टीसाठी माझ्या आणि त्या प्राचार्याच्या शारीरिक संबंधाची व्हिडीओ क्लीप तयार केली, अशी कबुली देत त्या तरुणीने आपण मला या सगळ्यातून मुक्त करा नाहीतर क्लिप तुमच्या पत्नीला दाखवेन, अशी धमकी दिल्याचेही तिने सांगितले.
४क्लिपची धमकी दिल्यानंतर प्राचार्याने आपल्याला बीडला तुझा गर्भपात करू फक्त तुझा एखादा डमी नवरा घेऊन ये, असे म्हटले. मी कोठून आणू असे म्हटल्यावर त्याने ठिक आहे, तू एकटीच ये, मी तुझ्यासोबत एक जणाला देतो, त्याला घेऊन तू रुग्णालयात जा आणि यातून मोकळी हो, असेही म्हटले.
४दहा दिवसापूर्वी औरंगाबादहून मी एकटीच आले होते. त्यावेळी माझ्यासोबत कोणीही नव्हते. जो तरूण माझ्यासोबत आहे, असे म्हटले जात आहे, त्याला मी ओळखतही नाही. तो त्या प्राचार्याचाच कोणीतरी असण्याची शक्यता आहे. त्या प्राचार्याने पोलिसांची दिशाभूल करत आपल्याला या प्रकरणात अडकविले.
ही तरुणी खेळाडू असून राष्ट्रीय स्तरावर डॉस बॉल आणि थाळी फेकमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. एका राष्ट्रीय स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाला होता. त्याचे प्रमाणपत्रही आपल्याकडे असल्याचा दावा तिने केला. याशिवाय पोलीस दलातही संधी मिळाली होती. मात्र, केवळ पैसे नसल्यामुळे माझे ते स्वप्न अधुरेच राहिले, असेही तिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.