चीनच्या विकासाचे प्रतिबिंब येथेही उमटवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:57 AM2017-07-19T00:57:07+5:302017-07-19T01:02:19+5:30
औरंगाबाद : चीनमधील चेंगडू आणि ड्युनहाँग शहरांमध्ये विकासाची अनेक कामे करण्यात आली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : चीनमधील चेंगडू आणि ड्युनहाँग शहरांमध्ये विकासाची अनेक कामे करण्यात आली आहेत. या कामांचे प्रतिबिंब ऐतिहासिक औरंगाबाद शहरातही उमटणार असल्याचे मत महापौर बापू घडमोडे व त्यांच्यासोबत गेलेल्या शिष्टमंडळाने एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले. चीनमधील चकचकीत आणि उच्च दर्जाच्या रस्त्यांची बांधणी, कचऱ्यावर प्रक्रिया करून राख तयार करण्याची कामेही औरंगाबादेत राबविण्याचा मानस शिष्टमंडळाने व्यक्त
केला.
सहा दिवसांच्या दौऱ्यावर सोमवारी मनपाचे शिष्टमंडळ शहरात दाखल झाले. मंगळवारी दुपारी महापौर बापू घडमोडे, माजी उपमहापौर प्रमोद राठोड, माजी सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, नगरसेवक कचरू घोडके, आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी चीन दौऱ्याची सविस्तर माहिती दिली.
चेंगडू या शहरात एका खाजगी कंपनीच्या सहकार्याने घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. दररोज २,४०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून राख तयार करण्यात येते. या राखेपासून विटा तयार करण्यात येतात. अवघे ७५ कर्मचारी हा संपूर्ण प्रकल्प अत्याधुनिक पद्धतीने हाताळतात. औरंगाबादेत दररोज ५०० टन कचरा जमा होतो. येथे हा प्रकल्प राबविण्यासाठी खर्चही कमी येईल, संबंधित कंपनीशी प्राथमिक बोलणे झाले आहे.
चेंगडू शहरातील रस्त्यांचा दर्जा पाहून महापालिकेचे शिष्टमंडळ अवाक् झाले. कुठेच कचऱ्याचा कणही दिसून येत नाही. कमी जागेत सुंदर दुभाजक, प्रत्येक प्रमुख रस्ता किमान सहा पदरी ठेवण्यात आला आहे. सायकल ट्रॅक, दुचाकीसाठी वेगळी लाईन, चारचाकीसाठी वेगळी लाईन असते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही डोळे दिपवणारी असल्याचे यावेळी शिष्टमंडळाने नमूद केले. पांडा सफारी पार्कची योजना औरंगाबादेतही राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. ड्युनहाँग शहर वाळवंटी प्रदेश आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी अप्रतिम योजना आखण्यात आल्या आहेत.
येथील वाळूतून संगीत निघते, असे मार्केटिंग करण्यात आले असून, पॅराग्लायडिंग, हेलिकॉप्टरद्वारे हवाई सफरही घडविण्यात येते. वाळवंटातही पाण्याची नदी आणण्यात आली आहे. याच भागात इ.स. ८ व्या शतकातील गौतम बुद्धांच्या मूर्ती आहेत. ३२ आणि २३ फुटी मूर्ती पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहेत.
नागरिकांमध्ये देशाबद्दल प्रचंड आस्था
चीनमधील प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाबद्दल प्रचंड आस्था आहे. देशप्रेमाने भारावलेल्या या मंडळींनी भारतातील कोणत्याही शहरापेक्षा १०० वर्षे पुढील विकास करून ठेवला आहे. त्याची तुलना अजिबात होऊ शकत नाही. तंत्रज्ञानातही या देशाने गगनभरारी घेतली आहे. दुसऱ्या देशाचे कोणतेच तंत्रज्ञान त्यांना मान्य नाही. त्यांनी स्वत:चे तंत्रज्ञान विकसित केले
आहे.